पुणे : गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंच्या समाधीचे दर्शन मिळावे म्हणून देशातील विविध ठिकाणाहून अनुयायी आले होते. मात्र, या आश्रमाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. तसेच आश्रमात अनुयायांना प्रवेश नाकारला. त्यामुळे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर बुधवारी आंदोलन केले.
"ओशो यांचा जन्म व मृत्यचे स्थळ, समाधी भारतात आहे. त्यांनी सर्वाधिक काळ भारतात घालवला. मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार मात्र पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय नेण्यात आले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोहचू न देता अनुयायींवरही अनेक बंधने लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातो. भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमाला त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. ओशोंचे विचार संपविण्याचे षडयंत्र सुरु आहे," असा आरोप ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त व 'ओशो वर्ल्ड'चे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती यांनी केला. आंदोलनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासहपटकथाकार व ओशो अनुयायी कमलेश पांडे, याचिकाकर्ते व माजी विश्वस्त स्वामी प्रेमगीतजी (योगेश ठक्कर), स्वामी मोक्षजी, स्वामी चेतनारूपजी आदी अनुयायी उपस्थित होते. त्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त ध्यान, भजन कीर्तन, प्रवचन, समाधी दर्शन अशा सोहळ्याचे आयोजन केले होते. आश्रमाबाहेर कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल येथे हा सोहळा साजरा करण्यात आला. ओशो आश्रमाची जागा विकण्याचे वाद, गळ्यात ओशोंची माळ न घालण्यासाठी घातलेली बंधने, ओशो साहित्याचे अधिकार आदी विषय त्यांनी यावेळी मांडले.
माळा घालू नये या बंधनाचा आग्रह धरत बुधवारी माळधारक अनुयायींना समाधीचे दर्शन घेऊ देण्यात आले नाही. दर्शन घ्यायचे असेल, तर माळ काढावी लागेल अशी सक्ती करण्यात आल्याचेही यावेळी अनुयायींनी सांगितले. आत प्रवेश नाकारला गेल्याने आश्रमाच्या प्रवेशद्वारा बाहेर चार तास भर पावसात आंदोलन करण्यात आले.