"ते वक्तव्य अजिबात योग्य नाही, पण न्यायाधीश राहिलेल्या माणसाने ते भाषण तिथेच थांबवायला हवे होते.."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 12:09 PM2021-02-05T12:09:29+5:302021-02-05T12:11:15+5:30
शरजिल उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते, अशा कडक शब्दात बी जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुणे : पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांनी हिंदू समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना प्रक्षोभक भाषण केले होते. हिंदू समाजाचा अवमान केल्याप्रकरणी उस्मानी याच्यावर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने भाजपने आक्रमक पावित्रा घेत राज्य सरकार व गृहमंत्री यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी पुण्यात शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शरजील उस्मानीच्या त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड,गृहमंत्री अनिल देशमुख व छगन भुजबळ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी देखील ते वक्तव्य चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एल्गार परिषदेवरून निवृत्त न्यायमूर्ती व एल्गार परिषेदेचे आयोजक बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर कडक शब्दात निशाणा साधला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, शरजिल उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते, अशा कडक शब्दात बी जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र आता याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास देखील महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत.
एल्गार परिषदेला परवानगी का दिली या विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेताना अजित पवार म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी नेमके कोण येणार? काय बोलणार? याची आम्हाला माहिती असते का? असा सवाल उपस्थित केला.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली, हिंदू समाज सडलेला आहे असे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केली होती.
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर अजित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांच्या मुलांचे पोलिसांनी काल जबाब घेतले आहेत. यात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही अशी सावध प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
पुणे महापालिका निवडणूक गनिमी काव्याने लढणार
पुणे महापालिकेची निवडणूक गनिमी काव्याने लढणार आहे. सासूचे दिवस संपले, सुनेचे दिवस आलेत, त्यानुसार लोक विचार करतील. महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये. शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार आहे. ग्रामपंचायत सारखच यश महापालिका निवडणुकांमध्ये मिळेल अशी खात्री आहे.