पुणे : उतरत्या वयात हाडांची झीज होत असल्याने अनेकांना ऑस्टिओअर्थारायटिसची (अस्थिसंधीवात) समस्या जाणवते. परंतु, सध्या बदललेली आणि अनाराेग्यकारक जीवनशैली, बैठी जीवनशैली, वर्क फ्राॅम होम यामुळे कमी वयातच किंवा तरूण वयातच अनेक तरूणांमध्ये ऑस्टियोआर्थरायटिसचा त्रास वाढल्याचे अस्थिराेग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
याबाबत ऑर्थाेपेडिक आणि जाॅइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट म्हणाले की, वृद्धापकाळातील संधिवात म्हणजे ऑस्टिओअर्थारायटिस हा संधिवात साधारणतः पन्नाशीनंतर जाणवायला सुरुवात होते. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, हाडांची ठिसूळपणा यामुळे अप्रत्यक्षरीत्या सांधे निकामी हाेतात. नियमित व्यायाम, वजन व आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास सांध्यांवर येणारा भार कमी करून सांधे आणि स्नायू बळकट ठेवता येऊ शकतात. मात्र, हा त्रास अलीकडे अनेक तरूणांमध्ये म्हणजेच आता ३५-४५ वयोगटातील तरूणही त्रस्त आहेत.
काय आहेत कारणे :
- बैठी जीवनशैली, लठ्ठपणा आणि दीर्घकाळ बसणे यामुळे आपल्या हाडांच्या आणि सांध्यावर परिणाम
- खाण्याच्या अयोग्य सवयी, जास्त वजन किंवा अपुरी शारीरिक हालचाल यामुळे हाडांची झीज व्हायला सुरुवात
- ऑस्टिओअर्थारायटिस कोणत्याही सांध्यावर परिणाम करते. प्रामुख्याने हात, गुडघे, खुबे आणि मणक्याला प्रभावित करते.
-पडद्यासमोर दीर्घकाळ बसणे, सूर्यप्रकाशाचा मर्यादित संपर्क हे ऑस्टिओअर्थारायटिस होण्यास कारणीभूत ठरणारे प्राथमिक घटक आहेत.
काय काळजी घ्याल?
- तरुणांमध्ये ऑस्टिओअर्थारायटिस समस्या टाळण्यासाठी कमी कॅलरीज असलेल्या अन्नाचे सेवन करावे
- जंक फूड, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
- आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा, दररोज व्यायाम करा आणि कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करा.
- सांध्यांवर जास्त ताण पडू नये, म्हणून योग्य पोषणाद्वारे निरोगी वजन राखणे महत्त्वाचे.
बैठ्या जीवनशैलीमुळे सध्या तरूणांमध्ये फेसेट आर्थाेपॅथी म्हणजे मणक्याची समस्या वाढताना दिसून येत आहे. ३० वर्षांहून कमी वयाच्या अर्ध्याहून अधिक तरूणांमध्ये ही समस्या जाणवते. खराब जीवनशैली, स्कूटर चालवणे, नियमित व्यायामाचा अभाव व शारीरिक हालचालींवर मर्यादा यामुळे स्पाइनमधील आर्थराइडची समस्या वाढत आहे.
- डॉ. शार्दुल सोमन, ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन