पुणे : जेट एअरवेजची विमानसेवा जमिनीवर आल्याने पुणेविमानतळावरून या कंपनीला दिलेल्या वेळा लवकरच दुसऱ्या विमान कंपन्यांना दिल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रवाशांना एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.जेट एअरवेज अडचणीत सापडल्यामुळे मागील काही महिन्यांपासून देशभरातील विमान उड्डाणे रद्द केली जात होती.
पुणे विमानतळावरूनही जेट एअरवेजची दररोज १८ विमाने उड्डाण करत होती. पण फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्याटप्याने एक-एक उड्डाण रद्द करण्यात येत होते. एप्रिलपर्यंत देशांतर्गत बहुतेक ठिकाणांची सेवा बंद करण्यात आली होती. दोन दिवसांपुर्वी कंपनीकडून अधिकृतपणे विमानसेवा बंद करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने या कंपनीसाठी निश्चित करून दिलेल्या वेळा इतर कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तोपर्यंत या वेळांमध्ये उड्डाणे होत नव्हती. विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वेळांमध्ये इतर विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिल्यास त्यांना त्याची मान्यता देण्यात येईल. जेट एअरवेजला या वेळांमध्ये सेवा देण्याबाबत अंतिम मुदत देण्यात आली होती. पण त्यांनी ही सेवा सुरू केली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकुण १८ वेळा या कंपन्यांना दिल्या जातील. यामध्ये दोन उ्डडाणे आंतरराष्ट्रीय होती. पुणे विमानतळावरून दररोज १६० विमानांचे उ्डाण होत होते. जेट एअरवेज बंद झाल्याने हा आकडा १४२ वर आला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पुन्हा नवीन विमाने सुरू होतील. -----------------प्रवाशांना परताव्याची प्रतिक्षाजेट एअरवेजच्या विमानांचे या महिनाभरात आरक्षित केलेल्या तिकिटांचे पैसे परत मिळविण्यासाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. विमान तिकीटांचे बुकींग करणाऱ्या एजंटांकडून याबाबत हात वर करण्यात आले आहेत. विमान कंपनीकडून तिकीटाचे पैसे परत मिळाल्यानंतर प्रवाशांना हे पैसे देणे शक्य होणार असल्याचे एजंंटांचे म्हणणे आहे. बहुतेक प्रवाशांना आतंरराष्ट्रीय विमानांचे तिकीट आरक्षित केले होते. बहुतेक प्रवासी आता एजंटमार्फत किंवा विविध कंपन्यांच्या ऑनलाईन सुविधेमार्फत तिकीटाचे आरक्षण करतात.
जेट एअरवेजची या शहरांमध्ये होती सेवा पुणे विमानतळावरून दिल्ली, मुंबई, जयपुर, इंदौर, कोलकाता, बंगलुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैद्राबाद, लखनऊ यांसह अन्य काही शहरांमध्ये विमानसेवा सुरू होती. तसेच सिंगापुर व अबुधाबी याठिकाणी आंतरराष्ट्रीय सेवाही दिली जात होती. या कंपनीच्या वेळांमध्ये या शहरांसाठी इतर कंपन्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर नवीन सेवा सुरू केल्या जाणार आहेत.