पुणे : राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वस्तूंचा व्यवसाय करायला बंदी असतानाही ई कॉमर्स कंपन्यांकडून सर्रास त्याचे उल्लंघन करुन बेधडकपणे व्यवसाय केला जात आहे. या ई कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुणे व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे राज्यातील सर्व व्यवसाय शासनाच्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार ५ एप्रिलपासून तब्बल २५ दिवस बंद आहे. लॉकडाऊन आता १५ मेपर्यंत वाढविला आहे. असे असताना लॉकडाऊनला सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांना कारवाईचा बडगा उचलण्याचा फतवा काढला जातो, परंतु, अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय करण्यास ई कॉमर्स कंपन्यांना मनाई असूनही या कंपन्यांकडून आदेश धाब्यावर बसवून राजरोस व बेधडकपणे आपला व्यवसाय करत आहेत.
स्पर्धेच्या या काळात ४५ दिवस व्यापाऱ्यांची दुकाने बंद आहेत. असे असताना ई कॉमर्स कंपन्यांकडे हेतुपुरस्पर डोळे झाकून रान मोकळे करुन देण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा वगळून इतर वस्तूंचा व्यापर करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांवर त्वरित कडक कार्यवाही करून या अनधिकृत व्यवसायाला पायबंद घालावा, अन्यथा व्यापाऱ्यांना दुकाने उघडून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी संघातर्फे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी पत्रकाद्वारे केली आहे.