...अन्यथा सर्व खासगी कोविड हॉस्पिटल्स बंद करणार; उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत डॉक्टर संघटनांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 08:00 PM2020-09-12T20:00:06+5:302020-09-12T20:52:10+5:30
बारामतीत डॉक्टरांना झाली होती शिवीगाळ व मारहाण...
बारामती: कोरोना संकटात अविरत काम करणाऱ्या डॉक्टर्स,कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन व शिवीगाळ करण्यात आली. तसेच एका डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात दोन दिवसांपुर्वी घडला. त्यामुळे शहरातील सर्व डॉक्टर संघटनांनी एकत्र येत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शहरातील आय.एम.ए., मेडिकोज गिल्ड, निमा व बारामती होमिओपॅथी संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरोपीला तातडीने ४८ तासांच्या आत अटक करावी. अन्यथा असुरक्षित वातावरणात काम करणे अशक्य असल्याने कोविड रुग्णालये आपले दवाखाने बंद ठेवतील, वैद्यकीय सेवा थांबविण्यात येईल,असा इशारा दिला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संंजीवकुमार तांबे सिल्वर ज्युबिली चे वैद्यकिय अधिक्षक डॉ.सदानंद काळे ,मुख्याधिकारी किरणराज यादव उपस्थित होते. मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ. संजय यांनी आरोपीला ताबडतोब अटक करून कठोर शासन करण्याची आग्रहि मांडणी केली. तसेच डॉ. राहुल जाधव यांनीही घडलेला प्रसंग येथे मांडत आरोपीविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.
डॉ. सुजित अडसूळ यांनी डॉक्टरांना न्याय द्या,असे प्रशासनाला साकडे घातले.''आयएमए'' च्या अध्यक्षा डॉ.विभावरी सोळंकी यांनीही
डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी करत डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी केली. डॉ पांडुरंग गावडे यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या.मेडिकोज गिल्ड चे सचिव डॉ. तुषार गदादे यांनी ४८ तासात आरोपीला अटक न केल्यास सर्व खासगी कोविड हॉस्पिटल्स बंद करण्याचा इशारा सर्व अधिकाऱ्यांना दिला.त्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिली.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आरोपीला अटक करून शक्य असल्यास तडीपार करण्याची शिफारस पोलीस खात्याला केली. तसेच डॉक्टरांना सध्या भेडसावत असलेल्या सर्व संकटात मदत करायचीही ग्वाही दिली .घडलेला प्रसंग अत्यंत घृणास्पद असून घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ''आयएमए'' चे सेक्रेटरी डॉ. संतोष घालमे यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. आशिष जळक, डॉ. चंद्रकांत पिल्लई, डॉ. राजेंद्र चोपडे, डॉ. प्रशांत मांडण, डॉ. राजेश कोकरे, डॉ. चंद्रशेखर धुमाळ, डॉ. सचिन घोरपडे, डॉ. जितेंद्र आटोळे, डॉ. सचिन घोळवे, डॉ. सूरज भगत, डॉ. हर्षल राठी,डॉ.विक्रम शिरदाळे, डॉ. अमर पवार, डॉ. प्रदीप व्होरा, डॉ. डी. एन. धवडे, डॉ. प्रशांत माने, डॉ. दिनेश ओसवाल, डॉ. आनंद हारके, डॉ. प्रितम ललगुणकर, डॉ. भास्कर जेधे, डॉ. वृषाली हारके आदी उपस्थित होते.
————————————————