.... अन्यथा राज्य सरकारविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार: रिक्षा पंचायतीचा गर्भित इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 01:19 PM2020-10-29T13:19:09+5:302020-10-29T13:19:51+5:30
विविध मागण्यांसाठी पुण्यात काँग्रेसभवनसमोर 'मौनव्रत' आंदोलन
पुणे: सरकारी मदतीच्या मागणीसाठी रिक्षा पंचायतीने गुरूवारी काँग्रेस भवनच्या प्रवेशद्वारावर 'मौन व्रत' आंदोलन केले. कोरोना टाळेबंदीच्या काळातील नुकसान भरपाई द्यावी यासाठी पंचायतीच्या वतीने राज्य सरकारमधील घटक पक्षांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे.
याआधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर असेच आंदोलन पंचायतीने केले होते. गुरूवारी सकाळी १० वाजताच पंचायतीच्या रिक्षा चालक,मालक सदस्यांंनी काँग्रेस भवनसमोर ठाण मांडले. कोणत्याही घोषणा वगैरे न देता ही सर्व मंडळी काँग्रेस भवनसमोरच्या पदपथावर शांत बसून होती. दरम्यान काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड तिथे आले. पंचायतीचे निवेदन त्यांनी स्विकारले.
छाजेड व बागवे म्हणाले, सरकारने टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे रिक्षा व्यवसाय बंद झाला हे खरे आहे. त्या बदल्यात आता विमा रकमेत सवलत द्यावी किंवा विम्याची मुदतवाढ करून द्यावी ही पंचायतीची मागणी रास्त आहे. परिवहन मंत्री तसेच विमा कंपन्यांचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत.
पंचायतीचे नितीन पवार म्हणाले, सरकारने रिक्षा चालकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. १० लाख इतकी मोठी रिक्षा चालक मालकांची संख्या आहे. त्यांचे टाळेबंदीने मोठे आर्थिक नुकसान झाले. विम्याची मुदतवाढ देणे सरकारला सहज शक्य आहे. त्यातून रिक्षा चालक मालकांना दिलासा मिळेल. सरकारला जाग यावी म्हणून तिन्ही घटक पक्षांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. तरीही सरकार काही करणार नसेल तर आता राज्यव्यापी आंदोलन केले जाईल.