लोणावळा : येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दुहेरी खून प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला तरी पोलिसांचे हात कोरडेच राहिल्याने येत्या २० दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास लोणावळ्यात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मृतांच्या नातेवाइकांसह त्यांच्या मित्रांनी दिला आहे. लोणावळा ते सहारा मार्गावर आयएनएस शिवाजी समोरील एस पॉइंट या ठिकाणी २ एप्रिलच्या रात्री लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात तंत्र अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सार्थक वाकचौरे व संगणक अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी श्रुती डुंबरे या विद्यार्थ्यांचा डोक्यात व तोंडावर दगडाने मारून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधीक्षक राजकुमार शिंदे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राम जाधव, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत १४ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ८ तपास पथके तयार करत घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करा. घटनास्थळ व परिसर पोलिसांनी अक्षरश: पिंजून काढला; मात्र काही पुरावे हाती न लागल्याने या घटनेचा तांत्रिक मुद्दयावर तपास सुरू करण्यात आला. जवळपास एक हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी व सव्वालाख फोन कॉल या प्रकरणात तपासण्यात आले. यामध्ये काही संशयित फोन कॉलची तपासणी कसून सुरू आहे. खून प्रकरणाचे काही महत्त्वाचे धागेदोरे आमच्या हाती आले आहेत, असे पोलीस अधीक्षक सांगत असले तरी तपासात प्रगती झाली नसल्याने सार्थकच्या नातेवाइकांनी व मित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्थकचा मित्र हृषीकेश कलाणी म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणाचे ट्विट केले मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता आमचा संयमाचा अंत होण्याची वेळ आली आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास असल्याने आम्ही अजून २० वाट पाहत आहोत. या वीस दिवसांत पोलिसांनी आरोपी अटक न केल्यास आम्ही रस्ता रोको व अन्य मार्गांनी या घटनेचा निषेध नोंदवू ,असे सार्थकचे चुलते कैलास वाकचौरे व मित्र अभिषेक रायरीकर यांनी सांगितले.(वार्ताहर)मुख्यमंत्र्यांनी तपासात लक्ष घालावे१मुख्यमंत्री महोदय सार्थक व श्रुतीच्या जागी तुमची मुलं असती तर संपूर्ण महाराष्ट्राचे पोलीस एकत्र करत तुम्ही आरोपी शोधून काढले असते. सार्थक व श्रुती हे देखील कोणाची तरी मुलं आहेत याचे भान ठेवत तपासात लक्ष घाला, अशी मागणी सार्थक व श्रुतीच्या मित्रांनी केली आहे. इतर बाबतीत ट्विटरवर रिटेक करणारे मुख्यमंत्री विद्यार्थ्यांनी वारंवार ट्विट करूनदेखील रिटेक करीत नसल्याने या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण पोलिसांना निवेदन २ सार्थक वाकचौरे याचे काका कैलास वाकचौरे, चुलत भाऊ विक्की वाकचौरे, सार्थकचे मित्र व सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी अभिषेक रायरीकर, हृषीकेश कलाणी यांनी १ मे रोजी लोणावळा पोलिसांना लेखी निवेदन दिले.
...अन्यथा रास्ता रोको आंदोलन
By admin | Published: May 03, 2017 2:08 AM