पुणे - मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे स्थानिक प्रभागातील प्रश्नांबाबत किंवा लोकांच्या अडीअडचणींबाबत जागरुक असतात. आपल्या माध्यमांतून या अडचणी सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच, त्यांच्या कामाला लोकांचा प्रतिसादही मिळतो. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते केलेल्या कामासंदर्भात माहितीही देतात. तर, अनेकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इशाराही देत असतात. आता, पुन्हा एकदा त्यांनी स्थानिक पुलाच्या प्रश्नावरुन महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांना इशारा दिला आहे. संबंधित पुलाचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
वसंत मोरे यांनी ४ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्या नाराजी चर्चा पुन्हा एकदा समोर आली. मात्र, शरद पवार यांच्यासमवेतही भेट ही राजकीय नव्हती, तर एका स्थानिक विषयाला अनुसरून होती, असे मोरे यांनी स्पष्ट केले होते. आता, पुन्हा एकदा कात्रज येथील स्थानिक पुलाचा प्रश्न उपस्थित करत वसंत मोरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
''कात्रज राजस सोसायटी चौक येथील पुलासमोरून जाणाऱ्या आंबील ओढ्यावरती पुणे महानगरपालिकेने पाणी जाण्यासाठी करोडो रुपये खर्च करून पूल तर बनवला पण पुलासमोरील राडारोडा उचलण्याचे विसरले. तसेच तीन मीटर उंचीची पूल बनवला पण पुलाच्या समोरची खोली करण्याची विसरून गेले. त्यामुळे, आज हा पूल कसाबसा एक मीटरचा राहिलाय. बाकी उर्वरित दोन मीटर या पुलाखाली गाळ साचला आहे. हा गाळ आत्ताच काढला नाही आणि समोरच्या ओढ्याचे खोलीकरण केले नाही, तर पुन्हा एकदा भविष्यात कात्रज परिसरातून पावसाच्या पाण्याचा मोठा धोका संभवतो,'' अशी समस्यापर पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे. तसेच, वेळीच जागे व्हा अन्यथा ठेकेदार आणि संबधित अधिकारी यांना याच पुलाखाली बांधून ठेवले जाईल, असा इशाराही मोरेंनी दिला आहे.
वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कात्रज येथील पुलाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचं दिसून येतं. त्यांचं हे ट्विट सध्या परिसरात चर्चेचा विषय बनलं असून संबंधित अधिकारी दखल घेऊन लक्ष देतील, हे पाहावे लागणार आहे.