बारामती : २४ तारखेच्या आत कायदा पास होऊन मराठा समाजाला आरक्षण द्या. अजिबात वळवळ करायची नाही. अन्यथा छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा घणाघात मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केला. बारामती शहरातील तीन हत्ती चाैकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीेने आयोजित विराट सभेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी सभेसाठी हजारो समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी जरांगे पाटील पुढे म्हणाले, आरक्षण देणारे आपलेच होते. त्यांनी आपल्याला मागे ठेऊन इतरांना आरक्षण दिले. त्यामुळे आपली लेकरं बरबाद झाली. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजातील आई-बाप व्याजाने पैसे काढून मुलांना शिक्षण देतात. तर मुले आई-बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतात. मात्र, आईबापाचं आणि मुलाच स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. त्यासाठी मूळ कारण ठरलेल्या आरक्षणाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.
ज्यांना आरक्षण माहिती होती, त्यांनी आपल्याला शिकविले नाही. मात्र, केवळ आपल्याकडे समाज येणार नाही, या भीतीपोटी त्यांनी आरक्षण शिकविले नााही. त्यामुळे समाजाच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या. आरक्षणाच्या मुळात जाणाऱ्यांना आरक्षण मिळाले. आतातरी सावध व्हा. हक्काच्या आरक्षणासाठी मागे सरु नका, हे पहिले आणि शेवटचे आंदोलन असल्याचे जरांगे पाटील यांनी नमूद केले. ओबीसींनी तुमचे १४ टक्के घेऊन बाकीचे मराठा समाजाचे आरक्षण परत द्यावे. मराठा समाज हाच माझा आई-बाप आहे. कोणाचा बालेकिल्ला नााही. हे राज्य जनतेचे आहे. मराठ्यासह सर्व समाजाचे हे राज्य आहे, असंही जरांगे म्हणाले.
गेल्या ७५ वर्षात सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मराठा समाजाच्या आपल्या बापजाद्यांनी मोठे केले. आपले समजून त्यांना त्यांची जात न पाहता मोठे केले. मग ते येवल्याचे बीडचे, यवतमाळचे असु द्या, बारामतीचे असु द्या. आमचे समजून मोठे केले. पक्षात मान, प्रतिष्ठा वाढवली. आज आमची लेकर आत्महत्या करीत आहेत, तर हे सगळे मिळुन आमच्या मराठ्यांच्या लेकराविरोधात बोलयला लागले. याचा अर्थ तुम्ही आम्हाला आपल मानतच नव्हता, हे सिद्ध झाल्याचा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.