- नारायण बडगुजर
पिंपरी : सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील लाचुंग या थंड हवेच्या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून आम्ही थांबलो आहोत. येथून गंगटोक येथे जाण्यासाठी निघालो होतो. मात्र ढगफुटी झाल्याने मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. वेळीच माहिती मिळाली म्हणून आम्ही पुढे गेलो नाहीत. अन्यथा आम्ही देखील ढगफुटीत अडकलो असतो, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील सुनीता धारसकर यांनी दिली. (sikkim disaster, sikkim rain, sikkim heavy rain)
सुनीता धारसकर (वय ४८, रा. पार्क टायटॅनियम, पार्क स्ट्रीट, वाकड) आणि त्यांची मुलगी विधी धारसकर (२१) या मायलेकी ९ जून रोजी पर्यटनासाठी ईशान्य भारतात गेल्या. मुंबई येथील इतर काही पर्यटक त्यांच्यासोबत होते. लाचुंग शहरातील एका हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. तेथून गंगटोक येथे जाण्यासाठी ते निघाले. दरम्यान ढगफुटी झाल्याने त्यांना हॉटेलवर परतावे लागले. त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातील काही जणांची औषधे संपत आली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून संपर्क साधून मदत उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने औषधे तसेच खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आली.
सुनीता धारसकर म्हणाल्या, आम्ही हॉटेलमध्ये थांबलो असून सर्वजण सुखरूप आहोत. कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. मात्र, काही पर्यटक अडकले असल्याचे समजत आहे.
सुनीता यांचे पती मनोज धारसकर म्हणाले, पत्नी सुनीता आणि मुलगी विधी यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. त्यांच्यासह त्यांच्यासोबतचे पर्यटक सुखरूप असल्याचे ऐकून दिलासा मिळाला. तेथून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.