पुणे : कोरोनामुळे जवळपास ७ महिने कोणतेही जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, जनरेटर्स, ट्रस, डेकोरेटर्स, मंडप, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या जवळपास चार ते पाच लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने जर लवकरात लवकर जाहीर कार्यक्रमांना परवानगी दिली नाही, तर आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील, असा इशारा साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने दिला.
'अनलॉक'च्या प्रक्रियेत सगळेच जीवनमान पूर्ववत सुरु होत असताना मग केवळ इव्हेंट्सवरच बंदी का? त्यानेच कोरोनाचा धोका अधिक आहे का? 'काम बंद , घर कसे चालवू', 'व्यवसाय बंद, हप्ते कसे फेडू', 'सामान धूळ खात पडलेय, गोडाऊनचे भाडे कसे भरू?' असे प्रश्न उपस्थित करत सरकारने जर लवकरात लवकर जाहीर कार्यक्रमांना परवानगी दिली नाही, तर आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील, असा इशारा साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने दिला.
पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनवतीने पुण्यात मंगळवारी ( दि. ७ ) मूकमोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना निवेदन देण्यात आले. जवळपास दीड ते दोन हजार व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले. तर ५० पेक्षा अधिक विविध संस्था संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. याप्रसंगी 'अनलॉक'च्या प्रक्रियेत सगळेच जीवनमान पूर्ववत सुरु होत असताना मग केवळ इव्हेंट्सवरच बंदी का? त्यानेच कोरोनाचा धोका अधिक आहे का? 'काम बंद , घर कसे चालवू', 'व्यवसाय बंद, हप्ते कसे फेडू', 'सामान धूळ खात पडलेय, गोडाऊनचे भाडे कसे भरू?' असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, माजी अध्यक्ष शिरीष पाठक, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, सोमनाथ धेंडे, सूर्यकांत बंदावणे, 'पाला'चे अध्यक्ष किशोर म्हात्रे, मेहबूब पठाण, बंडूशेठ वाळवेकर आदी उपस्थित होते.
असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी म्हणाले, "कोरोनामुळे जवळपास ७ महिने कोणतेही जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे यासंबंधित व्यवसायावर जवळपास चार ते पाच लाख लोकांची कुटुंबे अवलंबून आहेत. त्या सर्व घरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पैशांची भ्रांत, थकलेले हप्ते आणि निराशा यामुळे या क्षेत्रातील अनेकजण आत्महत्येचा मार्ग पत्करू लागले आहेत. त्यामुळे सरकारने याचे गांभीर्य ओळखून इतर व्यवसायाप्रमाणे अटी-शर्थींसह आम्हालाही जाहीर कार्यक्रम आयोजिण्यास त्वरित परवानगी द्यावी."
सोमनाथ धेंडे म्हणाले, "व्यावसायिकांना कर्जाचे हप्ते भरण्यास शिथिलता द्यावी. व्यावसायिकांना त्यांच्या मुलांच्या शाळा व कॉलेजच्या फीसमध्ये सवलत मिळावी.तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने काढून द्यावा."