मंगेश पांडे, पिंपरीकेंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार शहर भाजपकडून सभासद नोंदणी अभियान सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी भाजप पदाधिका-यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आहे. मात्र, तीन दिवसांपुर्वीच्याच दिल्लीच्या निकालामुळे मोदी लाटेवर स्वार होऊन महापालिका निवडणुकीला समोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या शहर भाजपला चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचा बालेकिल्ला पालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. भारतीय जनता पक्ष गेल्या दोन-तीन पंचवार्षिक तिसरया, चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही भाजपचे नगरसेवक निवडून येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशातच मागील वर्षी केंद्रात बहुमताने तर राज्यात मित्रपक्षांच्या मदतीने भाजपची सत्ता आली आहे. कधी नव्हे तो लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने शहरात भाजपला एक आमदार मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत एकूण मतांची टक्केवारीही वाढली असल्याचा दावा भाजप पदाधिकारयांकडून केला जात आहे. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांचेही लक्ष आता पालिका निवडणुकीकडे लागले आहे. प्रदेशाध्यक्षासह मंत्र्यांनीही शहरात लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक पदाधिकारयांमध्येही वेगळाच जोष संचारला असल्याचे दिसते. अशातच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न भाजपसमोर ‘आ’ वासून उभा आहे. सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न सोडविण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याची खरी स्थितीही आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये भाजपला उमेदवार मिळणेही कठीण होत होते. मात्र, केंद्र व राज्यातील यशामुळे अनेकजण आतापासूनच भाजपकडे वळू लागले आहेत. सध्याच्या महासदस्य नोंदणीत अधिकाधिक नोंदणी करण्याचे ‘टार्गेट’ पदाधिकारयांना देण्यात आले आहे. मात्र, केवळ सदस्य नोंदणी पूर्ण करून शहरात भाजपला यश संपादन करणे शक्य होईल का हे देखील तपासणे गरजेचे आहे.पालिका निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपला हवे तसे वातावरण निर्माण होण्यासाठी मोठी ताकत लावावी लागणार हे निश्चित आहे. ही वस्तुस्थिती गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत पहायला मिळाली. मोदीलाटेचे वातावरण असतानाही राट्रवादीचे टाक निवडून आले. यामुळे मोठी ताकत असलेल्या राट्रवादीला आव्हान देत शहरात पाय रोवू पाहणारया भाजपला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार हे निश्चित आहे.
...अन्यथा पालिका जिंकणे दूर
By admin | Published: February 13, 2015 5:01 AM