पुणे : पहिल्याच्या पटनोंदणीसाठी शिक्षण विभागाने हाती घेतलेला ‘गुढीपाडवा पट वाढवा’ हा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अंगणवाडी प्रवेशासाठी १३ ते २० जून कालावधीमध्ये हे पटनोंदणी अभियान हाती घेतले आहे. जास्तीत जास्त मुलं आपल्याकडे यावीत म्हणून सोशल मीडियाचा वापरही करण्यात येत असून त्याची चित्रफित तयार केली असून गुरुवारी या अभियानाचा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. आपली मुलं... आपली अंगणवाडी असे आवाहन घरोघरी जाऊन करण्यात येणार असून ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांचा प्रवेश घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्जही तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुढीपाडव्याच्या आठवड्यात पटसंख्या वाढविण्यासाठी पहिलीच्या प्रवेशासाठी ‘गुढीपाडवा पट वाढवा’ ही मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे पहिल्यांदाच जूनच्या अगोदर पहिलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले. त्यामुळे समाजकल्याण विभागानेही अंगणवाडी प्रवेशासाठी कंबर कसली आहे. त्यांनी आजपासून पटनोंदणी अभियान हाती घेतले आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार असून तशी चित्रफित तयार करण्यात आली असून त्यात समाजकल्याण विभागामार्फत माता व सुदृढ बालकांसाठी कोणते उपक्रम राबविते, याची माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)जिल्हास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी सांख्यिकी यांची कार्यशाळा घेऊन या अभियानाचे नियोजन केले जाणार आहे.अंगणवाडी कार्यक्षेत्रातील ३ वर्षे वय पूर्ण झालेल्या सर्व बालकांची पटनोंदणी केली जाणार आहे. अंगणवाडीसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील ३ वर्षे पूर्ण वय बालकांच्या घरी भेट देऊन विहीत नमुन्यातील फॉर्म भरून घेणार आहेत. फॉर्मचा एक भाग पोहोच म्हणून पालकांना दिला जाईल. त्यावर बालकांना आहार देणेबाबत, तसेच स्वच्छतेबाबत व इतरही उपयुक्त संदेश लिहिलेले आहेत. या संदेशाद्वारे पालकांमध्ये जाणीवजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आपली मुलं, आपली अंगणवाडी!
By admin | Published: June 04, 2016 12:32 AM