बारामती: लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडुन संविधान बदलणार असल्याचा चुकीचा आरोप करत तसा ‘नरेटीव्ह’पसरविला गेला होता. संविधानाबाबत असं कधीही घडणार नव्हते, घडणार नाही. संविधानाबाबत पंतप्रधानांपासून सर्वांना आदरच आहे. मात्र,विरोधकांनी पसरविलेल्या चुकीच्या ‘नरेटीव्ह’ची मोठी किंमत आम्हाला चुकवावी लागली असे पराभवाचे कारण सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
बारामती येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासह बारामती विधानसभेचा जाहिरनामा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी आयोजित पत्रकार परीषदेत पवार बोलत होते.यावेळी पक्ष निरीक्षक सुरेश पालवे,प्रभारी तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे ,ज्येष्ठ नेते किरण गुजर आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, लोकसभेत दिसणारा बारामतीकरांचा कल विधानसभेत सध्या निश्चित बदलला आहे. २३ तारखेला तो आपल्याला समजेल. संपुर्ण बारामतीचे मतदार हाच माझा परीवार आहे. ते मला जिंकुन आणतील,असा दावा पवार यांनी केला आहे.
राज्यातील कंपन्या गुजरातला नेल्या जात असल्याचा विरोधकांचा आरोप खोटा आहे. उलट केंद्र सरकारने वाढवण बंदर प्रकल्पाला ७५ हजार कोटी रुपये मंजुर केले आहेत. हे बंदर देशातील मोठे बंदर असेल. याशिवाय वंदे मातरम, बुलेट ट्रेनसह विविध प्रकल्प होणार आहेत. त्याचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पिकविमा, शुन्य टक्के दराने पिककर्ज,मोफत वीज आदी योजना दिल्या आहेत. शिवाय आमची लाडकी बहिण योजना लोकप्रिय झाल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या अगोदर तुम्ही हा राजकीय निर्णय घेतला असता तर, या पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले,आमच्याकडे मराठीत ‘आत्याबाइला मिशा असत्या तर..’ अशी म्हण आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा नको. उगीच त्याची ‘ब्रेकींग न्युज’ होईल. महायुतीच्या नेत्यांना, वाचाळवीरांना चुकीचे वक्तव्य न करण्याबाबत, तसेच समाजात तेढ निर्माण होइल, नविन प्रश्न निर्माण होइल, असे काेणतेही वक्तव्य न करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. मतदानाला १४ दिवस राहिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या आम्हा तिघा प्रमुख नेत्यांना वेेगवेगळ्या सभांना जावे लागणार आहे. त्यामुळे उद्या आम्ही तिघे एकत्रित दिसणार नाही. त्यावेळी वेगळ्या बातम्या चालवु नका, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकोप्याने निवडणुकीला सामारे जाणार असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासह बारामतीच्या पक्ष कार्यकर्ते यांनी आग्रह केल्याने माझी बारामतीमधुन पक्षाने माझी उमदेवारी जाहीर केली. त्यानंतर समोरच्यांनी उमेदवार जाहीर केला. माझ्यासमोर कोणता उमेदवार उभा करायचा, हा त्यांचा अधिकार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी काका विरुध्द पुतण्याच्या पवार विरुध्द पवार लढतीबाबत काय वाटते,या पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.
मंगळवारी बारामतीत झालेल्या प्रचारसभेत ‘साहेबां’नी कौतुक केले. ते चांगलं वाटतं. पण आता तरुण उमेदवाराला संधी द्या,हे ‘ साहेबां’चें वक्तव्य चांगलं नाही वाटत. मी काय म्हातारा बितारा वाटतो का, पाहिजे ते करायला सांग, नाही केले तर पवारांची आैलाद सांगणार नाही, असा टोला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्कीलपणे लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.