पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नरेंद्र मोदींनी सांगितलं तर आम्ही वाघाशी दोस्ती करायला तयार आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. मात्र, त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी दोस्ती करायची, अशा शब्दात उत्तर दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी आहे, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही असा जोरदार टोला लगावला आहे.
पुण्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते. पाटील म्हणाले, संजय राऊत म्हणाले ते अगदी खरे आहे. आम्ही जंगलातल्या वाघाशी आमची दोस्ती करतो,पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती. आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे. तसेच राज्यात आजही भाजप नंबर एकचा पक्ष आहे हे सांगतानाच त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वेगवेगळ्या निवडणुका लढण्याचे आव्हान दिले.
पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या विरुद्ध महापालिका,जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळण्यासाठी मजबूत संघटन निर्माण करून पंढरपुर, ग्रामपंचायतसारख्या निवडणुकांमध्ये जसे आम्ही तिघांच्या विरुद्ध आम्ही एकटे लढून जिंकलो. तसेच स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका जिंकायचा राजकीय संकल्प माझा आहे.
मुंबईकर येत्या महापालिकेत शिवसेनेला धडा शिकवतील पाटील म्हणाले, गेल्या २० वर्षां जास्त काळापेक्षा मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात देखील ते सत्तेत आहे. तसेच ४० हजारांचे त्यांचं बजेट असते. ५८००० कोटींच्या ठेवी आहे . पण तरीदेखील मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहे. येत्या महापालिकेत मुंबईकर शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो शिकवतील.
संजय राऊतांनी दिल्या चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो