नीलेश राऊत-
पुणे : कंटन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या शहरातील पाच क्षेत्रिय कार्यालय परिसरातील रेड झोनमधील सुमारे साडेसात लाख लोकांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून, आत्तापर्यंत दोन लाखाहून अधिक नागरिकांची प्रत्येकाची वैयक्तिक तपासणी करण्यात आली आहे. कंटन्मेंट झोनमध्ये एकही कोरोनाबाधित राहू नये म्हणून ' कोरोना फ्री 'चे ध्येय घेऊन पालिका प्रशासनाने हे काम हाती घेतले असून, येत्या सात दिवसात या भागातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणार आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी ' लोकमत' ला याबाबत माहिती दिली. शहरातील येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोलेरस्ता, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील रस्ता या पाच क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील कंटन्मेंट झोनमधील प्रत्येकाची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. याकरिता पालिकेच्या १३ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनसह शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या ६० व्हॅनही खासगी डॉक्टरांसह या कार्यात सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून आता रेड झोन, हॉटस्पॉटमधील दाट वस्ती व ८ प्रमुख झोपडपट्टी भागावर लक्ष केंद्रित करून ट्रेसिंग व टेस्टिंगवर अधिक लक्ष देण्यात येत आहे.मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीतून २०० जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून, त्यांना विविध रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ज्यांना कोरोना संबंधित लक्षणे आढळून आले आहे, अशा नागरिकांना त्यांच्या घरापासून दूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये न हलविता, त्याच परिसरातील शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. परिणामी संबंधित व्यक्तीही या क्वारंटाईन होण्यास तयार होत असून, आपण घरापासून दूर नसल्याची भावनाही त्याच्यात निर्माण होत असून त्याचे आता प्रशासनाला पूर्ण सहकार्य मिळत आहे. -----------------कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्ध्यांचीच आवश्यकताशहरातील रेड झोनमध्ये सूक्ष्म तपासणीचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, याकरिता मनपा प्रशासनास मोठया प्रमाणावर कोरोना विरोधात लढणाऱ्या योध्द्यांची आवश्यकता आहे. आजमितीला स्वयंसेवी संस्थांनी यात मोठा पुढाकार घेतला असून ,यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, नर्स यांचा समावेश आहे. या कार्यात आणखी हात भार लावण्याकरिता नागरिकांनी पुढे येऊन या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन रूब्ल अगरवाल यांनी लोकमतच्या माध्यमातून केले. कोरोना योध्दा करिता नोंदणीकरण सुविधा उपलब्ध असून, याकरिता इच्छुकांनी ँ३३स्र://ूङ्म५्र२िी५ंह्यस्र४ल्लीूङ्म१स्रङ्म१ं३्रङ्मल्ल.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर नोंदणी करावी़ ----------------------------* कंटन्मेंट झोनमधील साडेसात लाख लोकांचे स्क्रनिंग होणार * सात दिवसात साडेसात लाख नागरिकांची तपासणी पूर्ण करण्याचे नियोजन* येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोलेरस्ता, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील क्षेत्रिय कायार्लातंर्गत होणार तपासणी* ७३ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन कंटन्मेंट क्षेत्रात तपासणीसाठी कार्यरत* संशयितांना परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवणार : क्षेत्रिय कार्यालयनिहाय क्वारंटाईन सेंटर* पालिकेच्या मदतीला शहरातील स्वयंसेवी संस्थाही सरसावल्या