लोहगाव (पुणे) : ‘गेल्या साडेसात वर्षांत वडगाव शेरीसह राज्याचा विकास थांबला आहे. राज्यातील तब्बल १५ लाख युवा दरवर्षी नोकरी शोधत असतात. सरकारमधील लोक इथल्या नोकऱ्या गुजरातला नेत असतील, तर आपण गप्प बसायचं का? सामान्य लोकांचे राज्य जर कुणी आणू शकत असेल तर त्याचं नाव शरद पवार (Sharad Pawar) आहे,’ असे प्रतिपादन आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी केले.
वडगावशेरी (Vadgaon Sheri) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ लाेहगाव येथे शनिवारी (दि.९) आमदार राेहित पवार यांच्या उपस्थितीत जनविकास सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी महायुतीतील नेत्यांसह आतापर्यंतच्या राज्यकारभारावर घणाघाती हल्ला चढवला.
पवार म्हणाले, ‘गेल्या ७ महिन्यांमध्ये २६५ बलात्काराच्या घटना घडल्या, ४५० विनयभंगाचे गुन्हे गेल्या ७ महिन्यांमध्ये दाखल झालेले आहेत. म्हणजे आज माता भगिनी सुरक्षित नाहीत. मग इथे असलेले लोकप्रतिनिधी रात्रीच्या वेळेस जास्त काम करतात हे कुठंतरी दिसतंय. खास मित्रांना मदत करण्याची भूमिका त्यांनी बजावलीय, असेही त्यांनी सांगितले. २००९ ते २०१४ बापूसाहेब आमदार असताना १४०० कोटींची कामे मंजूर करून आणली. त्याची आजची किंमत ५ हजार कोटींच्या वर जाते.
सध्या घड्याळ पडलंय बंद रात्रीस खेळ चाले, असं काहीसं भाजपचं झालंय. हे सरकार “जाऊद्या” सरकार आहे. रिंगरोडच्या कामात यांनी २६ हजार कोटींची दलाली खाल्ली. सध्या घड्याळ बंद पडलेलं आहे, लोकशाहीच्या माध्यमातून पुढच्या उमेदवाराचे बारा वाजवायचे, असा घणाघात त्यांनी सभास्थळी केला.
संत तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मी ठासून सांगतो, येत्या अडीच वर्षांत लोहगावचा विकास करण्याचे काम पार पाडणार. महाराष्ट्राची निवडणूक चुरशीची असली तरी माझा विजय निश्चित आहे. - बापू पठारे, उमेदवार, महाविकास आघाडी