भानुदास पऱ्हाड
आळंदी : संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. कारण 'कोई रहे या नही रहे भारत बना रहना चाहीए' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
तीर्थक्षेत्र आळंदीत प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवी’ कार्यक्रमाचा शुभारंभ मोहन भागवत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वामी राजेंद्रदास महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, सदानंद महाराज, मारोती महाराज कुरेकर, लोकेशमुनी, प्रणवानंद महाराज आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
भागवत पुढे म्हणाले, अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामलला विराजमान झाले आहेत. जे जे मंगल घडते आहे ती ईश्वराची इच्छा आहे. देशातील महापुरुष, संत महात्म्यांच्या सामर्थ्य आणि पुरुषार्थामुळे हे शक्य होत आहे. ही नियतीची योजना आहे. जे झोपले आहेत त्यांना जागे करण्यासाठी संत कायम प्रयत्न करत असतात. ज्ञानाचे अनुसंधान करणारे ऋषी असतात व ते सर्वत्र पोहचविण्यासाठी पुरातन काळापासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील बांधव हे संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान समजू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु ते जुन्या काळापासून अनेक छोटे छोटे विज्ञाननिष्ठ प्रयोग करीत असतात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे जनमानसात असणारे गुण आहेत. त्यात सातत्य ठेवण्याचे काम संत - विद्वान करत असतात. त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी ईश्वर निष्ठाची मांदियाळी मागितली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे राज्य व्हावे ही 'श्रीं'ची इच्छा असे स्पष्ट केले. त्यामुळेच असे सात्त्विक कार्यक्रम होणे ही नियतीची इच्छा आहे.
दरम्यान माऊलींच्या मंदिरापासून हरिनामाचा गजर करत ग्रंथ शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक संजय मालपाणी यांनी केले. प्रास्ताविक गिरिधर काळे यांनी तर आनंद राठी यांनी आभार मानले. स्वामी गोविंद देव गिरी महाराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रकाशित केलेले डाक तिकीट भेट म्हणून पाठवले आहे. भाजपचे माजी उपाध्यक्ष शाम जाजू व आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत मोहन भागवत यांनी ते त्यांना प्रदान करण्यात आले. तसेच स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी लिहिलेल्या महाभारत विषयक पहिल्या खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
'' जग बदलत असले तरी आपण आपले मूळ विसरू नये. ज्ञान आणि विज्ञान याची आपल्याकडे परंपरा आहे. आपल्याला विश्वाला ज्ञान द्यायचे आहे. भारत विश्वगुरू होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत राहायला हवे. महाभारतानंतर ज्याप्रमाणे नैमिषरण्यात ऋषी संमेलन होऊन शास्त्रावर मंथन झाले, त्याचप्रमाणे इथेही या निमित्ताने अनेक संत महंत एकत्रित येत आहेत.त्यातून विश्व कल्याणासाठी मंथन होईल- मोहन भागवत, सरसंघचालक.