पुणे : वैयक्तिक कर्तव्यासोबत राष्ट्रीय कर्तव्य बजावणेही तितकेच महत्वाचे आहे, असे सांगत पुण्यातील सरपोतदार बंधूंनी मतदानाचा हक्क बजावला. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवार 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून उन्हाच्या आधी मतदान करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे.
मतदान हे आद्यकर्तव्य म्हणत यावेळी विवेक विकास सरपोतदार आणि योगेश विकास सरपोतदार या दोन भावांनी त्यांचे वडील विकास सरपोतदार यांच्यासह शनिवार पेठेतील अहिल्यादेवी शाळेत मतदान केले. मात्र, उल्लेखनीय बाब अशी की, आज त्यांच्या आई विनय सरपोतदार यांचा दशक्रिया विधी आहे. तरीही, त्याआधी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी मतदानाचा हक्क बजावून पुढील विधींसाठी ओंकारेश्वर घाट गाठला.
यावेळी विवेक सरपोतदार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आम्ही कधीही मतदान चुकवत नाही. आमच्या आईनेही कधीही मतदान करण्याचे टाळले नाही. अगदी आजारी असतानाही ती आवर्जून मतदान करत असायची. आम्ही जर दशक्रियेपूर्वी मतदानाचा हक्क बजावू शकतो तर तुम्ही का बजावू शकत नाही, म्हणत त्यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांचे बंधू योगेश म्हणाले की, मतदान आपला हक्क आहे आणि तो आपण बजावयलाचा हवा. प्रत्येकाने न चुकता मतदान करायला हवे.