वाघापूर : ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची...’ अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर; पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल, तर आमचे रक्त सांडावे लागेल, असा इशारा बाधित गावांतील शेतकºयांनी शासनाला दिला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात विमानतळाविरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर व कुंभारवळण या ७ गावांमधील २,८३२ हेक्टरवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच, शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या असून मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे, त्यांचे गट नंबर प्रसिद्ध केले. त्यामुळे आमच्याबरोबर शासनाने कोणतीही चर्चा न करता गट नंबर जाहीर केलेच कसे? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामसभा घेऊन शासनाचा जोरदार निषेध केला आहे.वनपुरी येथे सरपंच नामदेव कुंभारकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २४) ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन जोरदारनिषेध केला.या वेळी उदाचीवाडीचे सरपंच संतोष कुंभारकर, सोसायटी चेअरमन किसन कुंभारकर, वनपुरीचे माजी सरपंच रामदास कुंभारकर, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मच्छिंद्र कुंभारकर, विमानतळविरोधी संघर्ष समितीचे सदस्य संतोष हगवणे सतीश कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, चंद्रकांत झेंडे, बबन कुंभारकर, संजय कुंभारकर, प्रकाश गायकवाड, बापू कुंभारकर, विकास कुंभारकर, काकासो कुंभारकर, तसेच वनपुरी, उदाचीवाडी, हगवणेवस्ती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, विमानतळ प्रकल्पाच्या एक-एक घोषणा होत असताना स्थानिक ग्रामस्थांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात शासनाविरोधात तीव्र असंतोष उफाळून येत असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वीच कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, खानवडी तसेच मुंजवडी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन शासनाचा जोरदार निषेध केला आहे. अनेक शेतकºयांनी याबाबत आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आमच्या जागेत विमानतळ प्रकल्प उभारत असताना शासनाने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही.
विमानतळाला आमचा विरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 2:25 AM