तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर

By राजू इनामदार | Published: November 8, 2024 07:15 PM2024-11-08T19:15:03+5:302024-11-08T19:18:43+5:30

सरकार आपल्या दारीचा प्रचार करण्यासाठी करोडो खर्च केले,युतीच्या आमदारांना जो विकासनिधी दिला तोही करोडो रूपयांच्या घरात गेला

Our plans can be implemented if you reduce your unconscious costs balasaheb thorat reply to Ajit pawar | तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर

तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर

पुणे: महायुती सरकारने केलेला बेभान खर्च कमी केला तरी आम्ही जाहीर केलेल्या योजना सहज राबवता येतील अशा क़डक शब्दांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. आघाडीने आश्वासन दिलेल्या योजनांचा खर्च कुठून करणार असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता.

काँग्रेसभवनमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात यांनी युती सरकारचा समाचार तर घेतलाच शिवाय अजित पवार यांनाही धारेवर धरले. पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, मागील अडीच वर्षात युती सरकारने बेभान खर्च केला. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींवर जो खर्च केला तो योजनापेक्षा जास्त आहे. सरकार आपल्या दारी चा प्रचार करण्यासाठी करोडो रूपये खर्च केले. युतीच्या आमदारांना जो विकासनिधी दिला गेला तोही करोडो रूपयांच्या घरात आहे. राज्याची सगळी आर्थिक शिस्त त्यांनी बिघडवली. हा खर्च कमी केला की आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व योजना सहज राबवता येतील असे थोरात म्हणाले. 

विरोधकांच्या मतांमध्ये विभाजन करायचे ही भारतीय जनता पक्षाची नेहमीची सवय आहे. महाविकास आघाडीत बंडखोरी होऊ नये यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. पुण्यातही तीनही बंडखोरांबरोबर पक्षाचे केंद्र, राज्य स्तरावरील नेते पाचपाच वेळा बोलले. आम्हाला यश मिळाले नाही हे वास्तव आहे, मात्र यामागे महायुतीचे नेते असावेत अशी शंका घेण्यास वाव आहे असे थोरात म्हणाले.

राज्यातील जनता सुज्ञ आहे. युतीचे हे सरकार कशापद्धतीने राज्यात आले याची मतदारांना माहिती आहे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली हे मतदारांना आवडलेले नाही. लोकसभेला युतीच्या विरोधात मतदान करून त्यांनी ते दाखवले. तोच प्रकार आता विधानसभेच्या निवडणुकीतही होणार आहे असा दावा थोरात यांनी केला.पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराला गुंडगिरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवण्यामागेही युती सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत असा आरोप थोरात यांनी केला. मतदार युतीच्या नेत्यांना धडा शिकवतील व आघाडीची सत्ता आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Our plans can be implemented if you reduce your unconscious costs balasaheb thorat reply to Ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.