बारामती : ईडी चौकशीच्या पार्श्वभुमीवर आमदाररोहित पवार यांनी सबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची भुमिका घेतल्याचे सांगितले. यापूवीर्ही वेगवेगळ्या यंत्रणांनी बोलावले आहे. त्यावेळी आम्ही सहकार्यच केलं आहे. तसंच आताही सहकार्य करणार असल्याची भुमिका आमदार पवार यांनी मांडली.
आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असुन ईडीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभुमीवर माळेगांव शारदानगर येथे पत्रकारांशी बोलताना आमदार पवार यांनी हि प्रतिक्रीया व्यक्त केली.
यावेळी पवार पुढे म्हणाले, नेमकं प्रकरण काय, कशाच्या आधारे बातम्या आल्या, हे माहिती नाही.मला हा विषय समजून घ्यावा लागेल, मला याबद्दल निरोप आल्यानंतर सत्यता लोकांसमोर ठेवु. आता जी कारवाई आहे, ती कोणत्या हेतूने किंवा जाणीवपूर्वक झालीय का हे पहावे लागेल. मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जी चौकशी असेल, त्याला सामोरे जाईल. त्यात काय प्रकरण आहे. हे पहावे लागेल,असे पवार म्हणाले.
सूडबुद्धी, दडपशाहीच्या विरोधात आणि सामान्य लोकांच्या विचाराचा विजय शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती बाबत पवार म्हणाले, कोणतीही युती ही विषय विचार लक्षात घेवून केली जाते. शिवसेनेला संभाजी ब्रिगेडसोबत युती योग्य वाटत असेल. बलाढ्य शक्तीसोबत लढायचं असल्याने कोणतीही संघटना छोटी किंवा मोठी नसते. सगळ्यांनाच विश्वासात घेवून एकत्र लढलं तर यश मिळू शकतं. सामान्य लोकांच्यात आता जे सुरु आहे, त्याबद्दल तीव्र भावना आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्या निवडणुका होतील. त्यात सूडबुद्धी, दडपशाहीच्या विरोधात आणि सामान्य लोकांच्या विचाराचा विजय होईल,असे आमदार पवार म्हणाले.
मोहीत कंबोज काय अभ्यास करतात ,याकडे मी लक्ष दिलेले नाही.
काही दिवसांपुर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी अजित पवार यांना ‘टार्गेट’ केले होते. सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी झाली पाहिजे, जुनी फाईल पुन्हा ओपन करावी, अशी मागणी कंबोज यांनी केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते कंबोज यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला होता. त्यानंतर कंबोज यांनी रोहित पवार यांच्या साखर कारखान्यांबाबतचा अभ्यास करीत असल्याचे ट्विट केले होते. या पार्श्वभुमीवर मोहीत कंबोज काय अभ्यास करतात ,याकडे मी लक्ष दिलेले नाही. माझ्यासमोर ज्या गोष्टी येतील, त्याला आणि चौकशीला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रीया आमदार पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.