पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे असे मी म्हटले नाही. सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा कायदेशीर तसेच वैज्ञानिक बाबी तपासून घेण्यात आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होणाऱ्या सुनावणीत नेमके ते स्पष्ट होईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली. आम्ही घेतलेल्या भूमिकेवर आयोगाकडून देखील शिकवतो होईल अशी आशाही तटकरे यांनी बोलून दाखवली.
पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र वाटपाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सत्तेत सहभागी झालेल्या नऊ मंत्र्यांवर तसेच ३१ आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत तटकरे यांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा कायदेशीर बाबी तसेच अलीकडील काळातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची वैधानिक बाजू तपासून घेतलेला आहे, असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले.
निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात याबाबत सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. सुनावणीवेळी त्या स्पष्ट होतील, असेही ते यावेळी म्हणाले. निवडणूक आयोग आम्ही घेतलेल्या भूमिकेवर आयोग शिक्कामोर्तब करेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पक्षासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोग लवकरच घेईल, असे वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नुकतेच बीड येथील सभेत केले होते. ही तारीख नेमकी कोणती असे विचारले असता, कार्यकर्त्यांना संबोधताना अशा स्वरूपाचे विधान करावे लागते. त्यातून कार्यकर्त्यांना पाठबळ मिळते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. शरद पवार गटाने कारवाई केल्यानंतर तुम्हीही तशीच कारवाई केली आहे का, असे विचारले असता त्यांनी तसे केले नसल्याचे स्पष्ट केले.
मराठा आरक्षणावरून आता इतर मागासवर्गीय संघटनांनी देखील विरोध दर्शविला आहे. त्यावर, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता तसेच कायदा घटना व आरक्षण याचा समन्वय साधून मार्ग काढावा, अशी भूमिका घेतली. मात्र, राज्य सरकार त्यावर विचारपूर्वक निर्णय घेईल असेही ते म्हणाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर गाढ झोप येते का, या प्रश्नावर आमची झोप मोडलेलीच नाही, असे स्पष्ट करत, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे नागरिकांच्या गरजा, प्रश्न वाढतच असतात. ते पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असते त्यासाठीच आम्ही सहभागी झालो आहोत, असेही ते म्हणाले. शरद पवार राज्यभर घेत असलेल्या सभांमधून अजित पवार गटाला लक्ष करीत आहेत. त्यावर तुम्ही शरद पवार यांना प्रत्युत्तर देणार का, यावर केवळ टीका केल्यानेच भूमिका स्पष्ट होत नाही. टीका न करता ही ती भूमिका जनतेपर्यंत मांडू व सत्तेत सहभागी का झालो हे पटवून देण्याचा प्रयत्न करू असेही तटकरे यांनी सांगितले.