पुणे: आम्ही उमेदवारी मागितली, पक्षाने दिली नाही, त्यांनी उमेदवार जाहीर केला, आम्ही पाठिंबा दिला. काैटुंबिक कारणामुळे मिरवणुकीला येता आले नाही, मात्र प्रचारात भाग घेणार आहोत, असे शैलेश टिळक यांनी भाजप प्रचाराच्या नियोजन बैठकीत सोमवारी सायंकाळी सांगितले. कुणाल टिळक यांनीही प्रचार करणार असल्याची माहिती दिली.
पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पक्षाकडून प्रचाराचे व्यवस्थित नियोजन सुरू आहे. टिळक कुटुंबीयांमध्ये कोणतीही नाराजी नाही. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही, त्यांच्या हातातून निवडणूक सुटली आहे. आमच्या नेत्याचा आधार त्यांना घ्यावा लागला आहे. शैलेश व कुणाल हे दाेघेही यावेळी उपस्थित होते.
शैलेश यांनीही कौटुंबिक कारणामुळे मिरवणुकीत येता आले नाही, असे स्पष्ट केले. उमेदवारी दिली नाही याचा अर्थ आम्ही विरोधात राहू असा नाही. प्रचारात भाग घेणार आहे. पक्ष विचार करत असतो यावर विश्वास आहे, असे ते म्हणाले. कुणाल यांनीही आपण प्रचारात कोपरा सभांचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. निनावी बॅनर लावले. फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, मात्र भाजपचा कार्यकर्ता देश प्रथम, पक्ष नंतर, शेवटी स्वतः असा विचार करतो, असेही ते म्हणाले.
प्रचारापासून बाजूला राहू नका : फडणवीस
कुणाल यांना सोमवारी दिवसभरात दोनवेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचे समजते. पक्षाच्या प्रचारात सहभागी व्हा, प्रचारापासून बाजूला राहू नका, विरोधकांना कोणतीही संधी देऊ नका, असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले असल्याची माहिती मिळाली.
आमचा विजय नक्की
विरोधी पक्षातील १९ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. त्यांची नावे योग्यवेळी समोर येतील. विरोधकांना आमच्या नेत्याच्या नावाचा आश्रय घ्यावा लागतो आहे, यातच सगळे आले. आमचा विजय नक्की आहे. - जगदीश मुळीक, शहराध्यक्ष भाजप