पुणे : मराठा आरक्षण देण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण माझा सवाल मनोज जरांगे पाटील यांना नाही तर मी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नान पटोले यांना विचारू इच्छितो की, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही दिले आरक्षण? ते म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मग आता भूमिका का मांडत नाहीत, त्यांनी त्यांचे मराठा आरक्षणाचे समर्थन सर्वांसमोर सांगावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपचे अधिवेशन पुण्यात सुरू आहे. त्यात फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आणी विरोधकांना त्यांची भूमिका मांडण्याचे आवाहन केले.
फडणवीस म्हणाले, समाजात आज दुफळी तयार झाली आहे. या राज्यात काही नेत्यांना वाटतं की, दुफळी करून आपल्याला फायदा मिळेल. ते पेट्रोल टाकण्याचे काम करत आहेत. निवडणुक येईल, जाईल. पण समाजातील दफळी भविष्यासाठी खूप नुकसान होईल. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आमची तीच भूमिका आहे. १९८८ पासून अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षण सुरू केले. त्यांचा बळी गेला पण तेव्हा आरक्षण दिले नाही. आपलं सरकार आलं आणि आरक्षण दिले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का आरक्षण दिले नाही. त्यांनी सांगितले की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. पण आता मतांसाठी दुफळी निर्माण करत आहेत. सुप्रिम कोर्टात देखील आपण आरक्षण टिकवलं. पण ठाकरे सरकारने ते घालवलं. पण शिंदे सरकार आले आणि पुन्हा आरक्षण दिले. आज विविध खात्यात भरती होत आहे.
आम्ही आण्णासाहेब पाटील महामंडळ तयार केले. त्यातून १ लाख उद्योजक तयार झाले आहेत. आपल्या सरकारने सारथी सुरू केले. पण जे आंदोलन चालले आहे. माझा जरांगे पाटील यांना सवाल नाहीय. मी ठाकरे, शरद पवार, पटोले यांना सवाल आहे. त्यांनी समर्थन द्यावे. ओबीसी आणि मराठे दोघांना ते लटकवून ठेवत आहे. मला शिव्या खायची सवय आहे. पण तुमचा खोटेपणा समोर आणणार आहे. ये पब्लिक है, सब जानती है. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
भाजपचे हिंदुत्व व्यापक आहे. आपली मानकं मानतो तो हिंदू आहे. पूजा कोणीही कुठेही करावी. हिंदूंना दहशतवादी बोलले जात आहे. विशाळगडवरील लोकांना दहशतवादी बोलत आहेत. राहुल गांधी हे हिंदूंना दहशतवादी म्हणत आहेत. छत्रपती यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदूत्वाबद्दल अपराधीपणा घेऊ नका. गर्वाने सांगा आपण हिंदू आहोत. हिंदूत्व म्हणजे सहिष्णुता आहे. सर्वांना आपण सोबत घेतोय. पाकिस्तानपेक्षा मुस्लिम समाज इथे अधिक चांगल्या प्रकारे नांदत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.