राहुल गणगे
पुणे : रोजगारासाठी ग्रामीण भागातून मोठ्या शहरात, महानगरांत येणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गावाकडे दोन ते तीन एकर शेती आहे; परंतु, ती पावसाच्या भरवशावर पिकवावी लागते. त्यामुळे पोटापाण्यासाठी पुण्यात जेमतेम पगारावर नोकरीसाठी सुशिक्षित बेरोजगारांचा लोंढा मात्र वाढत आहे. शहरात १५ ते २० हजारांत मिळेल ती नोकरी करून या माध्यमातून कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी तरुणाई धडपडत आहे. पावसाळ्याचा तोंडावर शेती पिकवण्यासाठी चार पैसे जमा करून खते, बियाणे यांची जुळवाजुळव करून एखादे पीक घेण्यासाठी प्रयत्न केला जातो; परंतु, पावसाने साथ दिली तर एखाद्या पिकाचा फायदा होतो. नाहीतर पावसाने रूप दाखवले तर जगण्याचा वांदा होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण १५ ते २० हजाराच्या नोकरीसाठी आपले बस्तान शहराच्या ठिकाणी बसवताना दिसून येत आहे. तसेच जगण्याचे साधन नसल्याने पुणे किंवा इतर ठिकाणी नोकरीच्या शोधात स्थलांतर व्हावे लागत असल्याने यावेळी तरुणांनी आपली व्यथा ‘लोकमत’कडे मांडली.
उत्पन्न कमी त्यामुळे मिळेना हमी
अल्पभूधारक शेतकरी शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो; परंतु, खाणारे अधिक आणि शेतीतील उत्पन्न कमी, त्यातच किडी रोगाचा प्रादुर्भाव मग सांगा शेती कशी करायची, अशी परिस्थिती सध्या अल्पभूधारक शेतकरीवर्गाची झाली आहे.
शेती, नोकरीचा मेळ बसेना आणि पोरगी मिळेना
सध्या लग्न जमवायचे झाले तर शेतीसहीत नोकरी कराणारा पाहिजे. अशी डिमांड मुलींच्या कुटुंबीयांकडून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळणे कठीण झाले आहे. शेती असूनही नोकरी नसल्याने कोणी मुलगी देण्यास तयार नाही. यामुळे शेतीचा खेळ अन् नोकरीचा मेळ काय बसेना आणि पोरगी कोणी देईना, अशी अवस्था झाली आहे.
गतिमान जीवनासाठी आकर्षण
लोकसंख्येची घनता आणि जगण्याची स्पर्धा जास्त असल्याने शहरातील जीवन हे गतिमान आणि विकसित समजले जाणारे जीवन आहे. सांस्कृतिक, औद्योगिक आणि नैसर्गिक संपन्नता उपलब्धता तसेच शहरात उद्योगधंदे भरपूर प्रमाणात निर्माण झालेले आहेत. त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी लोक शहरांत स्थलांतर करत असतात.
म्हणून आम्ही करतो नोकरी
''लातूरपासून ८५ किलोमीटर अंतरावर असलेले जगळपूर बुद्रुक हे माझे गाव आहे. गावाकडे शेती आहे; परंतु, ती पावसाच्या भरवशावर पिकवावी लागते. ते पण पाऊस चांगला झाला तर पीक हाती येते नाही तर मातीत जाते. मग आमच्याकडे जगण्याचे साधन नसल्याने आम्हाला पुणे किंवा इतर ठिकाणी नोकरी करत कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. - कपिल कदम, जगळपूर बुद्रुक, सध्या धनकवडी, पुणे''
''मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी गावात माझी शेती आहे; परंतु, शेतीतून मिळणारे उत्पन्न तसेच होणारा खर्च यामुळे हाती काहीच मिळत नाही. त्यामुळे मी पुण्यात सध्या नोकरी करीत आहे; परंतु, शहरातही रोजगाराची मारामार होत आहे. कमी पगारात मिळेल ते काम करावे लागत आहे. - अविनाश वेदपाठक, मोहोळ, सध्या पुणे सदाशिव पेठ''