राजू इनामदार-
पुणे : जर्मनीतील म्युनिकमध्ये गेले काही दिवस कोरोना दहशतीच्या वातावरणात असलेल्या मराठी बांधवांना इकडचीही काळजी वाटत होती. मात्र, आता हळुहळू त्यांचा ताण हलका होत असून तुमचाही ताण कमी होईल,असे त्यांचे भारतीयांंना सांगणे आहे.मात्र, त्यासाठी सरकारच्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन.करा, त्या तुमच्या हितासाठीच आहेत असेही.आवाहन ते करत आहेत. म्युनिकमध्येही कोरोना विषाणूचा आजार दाखल झाला असून तेथील सरकारने लॉकडाऊन जाहीर करून तीन आठवडे झाले आहेत.मागील ५ वर्षांपासून म्युनिक मध्ये राहणार्या राजश्री पुराणिक 'लोकमत' बरोबर बोलताना म्हणाल्या, आमचे व पती उपेंद्र याचेही वर्क फॉर्म होमच सुरू आहे. मुलगा इशान याची शाळाही सध्या ऑनलाईन आहे. इथे लॉकडाऊन जाहीर होऊन आत्ता साधारण तीन आठवडे होतील. अजून दोन आठवडे लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्या झाल्या जी दहशत माझ्यासारख्या लोकांच्या मनात होती तिचं रूपांतर आता आशेत होतंय. आता एक आशा वाटती आहे की सगळं नक्कीच हळुहळू का होईना पूवीर्सारखं होईल. मनावर आलेला ताण हलका होतोय; त्याला कारण आजूबाजूचं वातावरण आणि जर्मनीची आरोग्ययंत्रणा उचलत असलेले योग्य पावलं आहेत.पुराणिक म्हणाल्या, नागरिकांना विश्वासात घेऊन इथे सर्व गोष्टी केल्या जात आहेत. दुसर्या बाजूने सांगायचे तर सरकारने ठरवून दिलेले नियम लोकही कसोशीने पाळत आहेत. जसं की दुकानाच्या रांगेत २ मीटरच्या अंतरावर उभे राहणे, कुठेही गर्दी न करणे, महत्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडणे इत्यादी. त्यामुळेच अगदी सुरूवातीला आम्हाला आलेला ताण, वाटलेली भीती आता कमी झाली आहे. इथे अजिबात घबराटीचं वातावरण नाहीये. लोक शांत आहेत. जे सुरू आहे, आपल्यासाठीच हे आहे याची त्यांना खात्री आहे. काल माज्या जर्मन शेजारणीशी बोलले तर त्या म्हणाल्या त्यांना ही नवीन जीवनशैली खूप आवडली. जसं की सोशल डिस्टंसिंग, सगळी दुकानं बंद असणे, रस्त्यांवरची गर्दी कमी होणे. आमच्या आजूबाजूच्या इमारतींमधले लोकही अधूनमधून गॅलरीत येऊन एकमेकांना प्रोत्साहित करतात.आम्ही सुद्धा महत्वाचं काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडतच नाही आहोत. भारतात व त्यातही पुण्यातली काळजी मात्र आहे असे पुराणिक म्हणाल्या. त्यांच्या बरोबर असणारे राहूल जोशी, केतकी जोशी, पराग वर्तक, सुप्रिया वर्तक यांच्याही नेमक्या याच भावना आहेत.आमचा ताण हलका झाला, तूमचाही नक्कीच होईल, मात्र सरकारच्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करा,लॉकडाऊनचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा! असे आवाहन त्यांनी केले.