पुणे : महापालिकेला राज्य शासनाकडून शुक्रवारी रात्रीपासून लस उपलब्ध न झाल्याने, शनिवार व रविवारचा दिवस लसीकरण सेवा ठप्प करणारा ठरला़ लसीचा हा तुटवडा व रविवारचा सुट्टीचा दिवस यामुळे पुणे शहरातील १८२ लसीकरण केंद्रांपैकी आज तब्बल १५६ लसीकरण केंद्र पूर्णपणे बंद होती़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : पुणे शहरात शनिवारी (दि.२४ एप्रिल) केवळ ५ हजार ३७० जणांना लस देता आली़ तर रविवारी (दि.२५ एप्रिल) १५६ लसीकरण केंद्र पूर्णत: बंद असल्याने केवळ १ हजार ७०६ जणांना लस देता आली आहे़ यात सर्वाधिक लसीकरण हे महापालिकेच्या केंद्रांवर झाले असून, हा लसीकरणाचा आकडा १ हजार ५४४ इतका आहे़ तर, खासगी लसीकरण केंद्रांवर १६२ जणांनाच लस देण्यात आली आहे़
दरम्यान, पुणे महापालिकेकडे रविवारी दुपारी राज्य शासनाकडून ३५ हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे या लसींचे दुपारपासून लागलीच सर्व केंद्रांना वितरण करण्यात आले आहे़ यामुळे पुढील दोन दिवस, तरी शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवरील लसीकरण व्यवस्था कार्यान्वित राहील़, अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ़ सूर्यकांत देवकर यांनी दिली़