पुणे : मुुंबई, कोल्हापूर, ठाण्यासह पुण्यात यापूर्वी ४० घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने पकडून त्याच्याकडून २६ घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत़ हर्षद ऊर्फ पक्या गुलाब पवार (वय २४, रा़ निकटेवस्ती, घोटावडे फाटा, पिरंगुट, ता़ मुळशी) व त्याचा साथीदार दिनेश मधुकर देशमुख (वय ३८, रा़ लक्ष्मी सोसायटी, रुपीनगर, तळवडे, निगडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़ त्यांच्याकडून ५२२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८८० ग्रॅम चांदीचे दागिने, मोटारसायकल असा १७ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांनी दिली़ गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस कर्मचारी गजानन सोनुने यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी हर्षद पवार व दिनेश देशमुख यांना पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार हडपसर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर केलेल्या चौकशीत गेल्या एक ते दीड वर्षात त्यांनी पुणे शहरातील हडपसर, विश्रांतवाडी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, अलंकार, बिबवेवाडी, कोरेगाव पार्क, मुंढवा, हिंजवडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २६ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले़ हर्षदवर यापूर्वी ४० घरफोड्याचे गुन्हे असून, दिनेश यावर यापूर्वीचे २ गुन्हे आहेत़ तुरुंगात असताना दोघांची ओळख झाली़ तुरुंगातून बाहेर आल्यावर ते प्रामुख्याने दिवसा घरफोड्या करीत होते़ त्यांनी सोलापूर, चाकण, लोणीकंद व इतर ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, प्रकाश लोखंडे, रिजवान जिनेडी, अशोक माने, प्रशांत गायकवाड, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, तुषार माळवदकर, अनुराधा धुमाळ, उमेश काटे, तुषार खडके, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, सचिन जाधव, इम्रान शेख यांनी केली आहे़स्वस्तात वाहने देण्याच्या बहाण्याने २७ लाखांची फसवणूकपुणे : कमी किमतीत वाहने देण्याचे आमिष दाखवून बुकिंगसाठी २७ लाख १० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकास अटक केली आहे. अझर रौख शेख (वय २५, रा. पेन्शनवाला मस्जिदसमोर, रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी हनिफ ऊर्फ आरिफ दस्तगिर सय्यद (वय ३४, रा. कोंढवा) याला अटक केली आहे. रोहित गणेश गायकवाड (वय २५, रा. ताडीवाला रस्ता) यांनी बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांना कमी किमतीत दुचाकी वा चारचाकी वाहने देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ते ८ लोकांकडून वाहनांच्या बुकिंगसाठी ३० जानेवारी ते २९ सप्टेंबरदरम्यान १५ लाख ५० हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. मात्र वाहने न देता फसवणूक केली. वाहन न मिळाल्याने फिर्यादींकडे बुकिंगसाठी टोकन दिलेल्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यामुळे फिर्यादी यांचे वडील गणेश गायकवाड (वय ५६) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी फिर्याद देण्यात आली आहे. फसवणुकीची रक्कम २७ लाख १० हजारांपर्यंत पोहोचल्याचे तपासातून समोर आले आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी कोणाला फसवले आहे का? याच्या तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.