लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इतिहास संशोधकांनी मांडलेल्या तथ्याच्या आधारे छत्रपती शिवाजीमहाराज यांना लावण्यात येणारी गोब्राह्मणप्रतिपालक पदवी चुकीची असल्याचे मत मी मांडले होते. त्यामुळे त्याबाबत कोण काय म्हणतो, त्याला मी किंमत देत नाही. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांची खदखद त्यातून बाहेर पडत असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ‘छत्रपती शिवाजी- महाराजांना गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, आम्हाला चुकीचा इतिहास शिकविण्यात आला’ असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सोशलमीडियातून टीकेची झोड उठविण्यात आली होती. लेख, काव्य, शायरी, विनोदांच्या माध्यमातून शरद पवार यांना नेटीझन्सनी लक्ष्य केले होते. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीच्या विषयावर भूमिका मांडण्यासाठी शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद बोलावली होती. या वेळी छत्रपती शिवाजी- महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नसल्याच्या वक्तव्यावरून होत असलेल्या गदारोळाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी त्यांची भूमिका मांडली.पवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज यांनी राज्य करताना धर्माचा कधीही विचार केला नाही. औरंगजेब, मुघल, इंग्रज हे परकीय शासक होते. शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या रयतेच्या राज्यावर हल्ला करणाऱ्या, त्याला विरोध करणाऱ्या परकीय शक्तींबरोबरच स्वकियांविरुद्धही ते लढले. शिवाजी- महाराज यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणं चुकीचे असल्याचे मत मी इतिहास संशोधकांनी मांडलेल्या तथ्याच्या आधारेच व्यक्त केले होते. त्यामुळे कोण काय म्हणतं, याला मी किंमत देत नाही.’’मीराकुमार योग्य उमेदवारराष्ट्रपतिपदासाठी एनडीएकडून उमेदवारी देण्यात आलेल्या मीराकुमार यांनी सात देशांमध्ये राजदूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. केंद्रीय कॅबिनेट व संसदेत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यासही चांगला आहे. त्यामुळे योग्य उमेदवार असल्याचे शरद पवार यांनी या वेळी सांगितले. एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात मीरा कुमार यांना उमेदवारी दिल्याबद्दल टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवरही पवारांनी ताशेरे ओढले. यापूर्वी प्रणव मुखर्जी, के. आर. नारायणन, प्रतिभा पाटील यांच्याविरोधात एनडीएने उमेदवार उभे केले होते. मग, आता यूपीएने उमेदवार दिला तर यांना काय अडचण आहे, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
जातीयवादी ठरवणाऱ्यांची खदखद बाहेर
By admin | Published: June 26, 2017 4:06 AM