पुणे : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावेळी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाला असून या खर्चावर आता पाणी सोडावे लागणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी ३० कोटी रुपयांची तरतूद आहे. यापैकी महापालिकेने तीन सदस्य प्रभाग रचना अंतिम झाल्यावर मतदार याद्यांच्या छापाईसाठी ७१ लाख, प्रभाग सोडत, आरक्षण सोडत यासाठी ६४ लाख रुपये खर्च झाले आहेत. तसेच व्हिडीओग्राफी, साउंड, स्टेशनरी, जनजागृती या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. यात जनजागृतीसाठी ५० लाख, मतदान पाकिटांसाठी ३६ लाख, निवडणूक कार्यालयांसाठी १ कोटी, सीसीटीव्हीसाठी ३५ लाख, मंडपसाठी ४ कोटी ५ लाख, वाहनांसाठी ७ कोटी रुपयांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे; पण आता चार सदस्यांचा प्रभाग झाल्यावर आजवर झालेला खर्च पाण्यात जाणार आहे.
नगरसेवकांची संख्याही बदलणार
महाविकास आघाडी सरकारचा तीन सदस्यीय प्रभाग रचना बदलून चार सदस्यीय प्रभाग करण्याच्या निर्णयामुळे सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेतील १७३ नगरसेवकांची संख्या २०१७प्रमाणे पुन्हा १६६ होणार आहे. ज्या शहराची लोकसंख्या तीस लाखांपेक्षा अधिक आहे, तेथे नगरसेवकांची संख्या १६१ ते १७५ या दरम्यान असावी, असा नियम आहे. त्यानुसार प्रत्येकी १ लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक याप्रमाणे पुणे शहरात १६६ इतकी नगरसेवकांची संख्या निश्चित होण्याची शक्यता आहे. २०११च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख ५६ हजार ८२४ इतकी आहे.