नीरा : कोरोना काळात शिक्षकांनी चांगले काम केले आहे. ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षक झटत आहेत. ही बाब कौतुकाला पात्र असली तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण बोगस करण्यात आल्याचा आरोप दस्तुरखुद्द पुरंदरच्या गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांपुढे केला. गायकवाड यांनी पंचायत समितीला घरचा आहेर दिल्याची चर्चा आज शिक्षकांमध्ये सुरू होती.
बुधवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी वाल्हे येथे नीरा-कोळविहिरे गटाच्या प्रभाग समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. यावेळी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुहास कांबळे, वाल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, या गटातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार व उपस्थित अधिकारी पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र या आढाव्यामध्ये पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी पुरंदर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या ‘शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणा’चा विषय चर्चेला घेतला व झालेल्या सर्वेक्षणाबाबत ‘शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण’च पुरंदरमधील शिक्षकांनी बोगस केल्याचे वक्तव्य सर्वांसमोर केले.
त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी यांनी अधिकारी पदाधिकारी या सर्वांसमक्ष केलेले वक्तव्य मान्य आहे का? आणि शाळाबाह्य सर्वेक्षणावर शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड हेच स्वतः शाळाबाह्य सर्वेक्षण बोगस झाल्याचे जाहीर करत असतील तर बोगस सर्वेक्षण करणाऱ्यांवर काय कारवाई होणार?
तसेच पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचे वक्तव्य मान्य आहे का? याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
या बैठकीला या प्रभागातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांसह पुरंदर तालुक्यातील शिक्षक संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मात्र या वक्तव्याबद्दल कोणीही ‘ब्र’ काढला नाही. त्यामुळे सर्वेक्षणाबाबत नक्की बोगसपणा काय झाला आहे हे पाहणे आगामी काळात औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.