खेड तालुक्यात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तालुक्यातील महाळुंगे गावात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. येथील १५ रुग्ण डेंग्यूच्या तापाने आजारी आहेत. डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
यामुळे महाळुंगे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाळुंगे (ता. खेड) येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या आहे. पाणी साचून देऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
महाळुंगे परिसरात गेली महिनाभरापासून थंडीतापाचे रुग्ण दिसू लागले होते. मात्र, बदलत्या तापमानामुळे आरोग्य बिघडत असल्याचे प्रथमदर्शनी जाणवले. परंतु, ही संख्या वाढत गेली. खासगी रुग्णालयात हे रुग्ण दाखल झाले आणि विविध तपासणीअंती डेंग्यूचे निदान डॉक्टरांनी केले. ग्रामीण भागातील हे रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने सरकारी पातळीवर ही माहिती मिळण्यास विलंब झाला.
महाळुंगे, चाकण, पिंपरी चिंचवड येथे विविध खासगी रुग्णालयात हे रुग्ण उपचार घेत आहेत.
मात्र, आरोग्य प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे रुग्णांना विविध रुग्णालयांत दाखल केले आहे.
महाळुंगे परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने काही कंपन्यांनी रासायनिक पाणी व मैलामिश्रित पाणी ओढे-नाले रस्त्यावर सोडल्याने ते दूषित पाणी साचत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच परिसरात असलेल्या गटारांवर मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास आहे. त्यातच या उघड्या गटारांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. "डेंग्यूचा उपचार सर्व सरकारी रुग्णालयांत उपलब्ध आहे. हा विषाणूजन्य आजार असल्याने लागण झालेल्या रुग्णाने आराम करणे, भरपूर पाणी पिणे, हलके जेवण, ताप आल्यास लगेचच डॉक्टरांशी संपर्क करावा." असे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.