डिंभे : उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भातापिकावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी तर भात शिवारं पिवळी पडू लागली असून भातखाचरांतील पाणी आटून गेले आहे. त्यामुळे भातशेती संकटाच्या छायेत आली असून याचा उत्पादनावर परिणार होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यामध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. या भागातील भातशेती ही संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जून, जुलैच्या दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात भातलागवडीची कामे सुरू असल्याचे पहावयास मिळते. जुलै अखेरपर्यंत भातलागवडीची कामे उरकली जातात. लागवड केलेली भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालाधी लागतो. आक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्रे तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम इत्यादी जातीच्या भातशेतीचा एक वेगळा सुगंध परिसरात दरवळत असतो.
पुणे जिल्ह्यातील भातशेतीला यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली साथ दिली. पेरणीच्या वेळेस योग्य वेळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची भात रोपे लावडीसाठी योग्यवेळी तयार झाली होती. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला आणि भातशेतीचे नुकसान झाले मात्र याच पावसावर भात लागवडीही उरकल्याने यंदा भातउत्पादक शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण पाहवयास मिळत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी भातशेतीला करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव होवू लागल्याचे चित्र आहे. आंबेगांव तालुक्याच्या फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली या भागातील भातशेती पिवळी पडू लागली आहे तर खाचरांतील पाणी आटून गेल्याने खाचरांमध्ये चिरा पडू लागल्या आहेत. भात उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होवू लागले आहे. भात उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र आसणाऱ्या जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने काढता पाय घेतल्याने केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती संकटाच्या छायेखाली येवू लागली आहे.
२५डिंभे
पावसाअभावी भात खाचरांतील पाणी आटू लागल्याने खाचरांना चिरा पडल्या आहेत. (छायाचित्र- कांताराम भवारी)