नीरा: पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता तेल्या, मर आणि मुळकूज अशा आजाराने जेरीस आणले आहे. या भागातील सुमारे ९०० एकर शेतीवरील डाळिंब बागा काढण्याची वेळ बागायतदारांवर आली असून, मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पुरंदर तालुक्यातील दक्षिण - पूर्व भागातील राख, कर्नलवाडी, गुळुंचे, नावळी तसेच वाल्हे गावच्या पूर्वेकडील वाड्या हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. १९९६ सालापासून या भागातील शेतकऱ्यांनी या दुष्काळी भागात डाळिंब शेतीचे प्रयोग सुरू केले. अत्यंत कमी पाण्यात येणार पीक म्हणून हे पीक या भागात चांगलच रुजलं. डाळिंबाचा उत्तम उत्पादन घेऊन या भागातील शेतकऱ्यांनी आपली कष्टाची चुणूक दाखवून दिली. डाळिंबापासून मिळणारं चांगलं आर्थिक उत्पन्न पाहून अनेक सुशिक्षित तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा डाळिंब शेती करणे पसंद केले. या तरुणांनी आधुनिक पद्धतीने शेती करीत पुरंदरमधील डाळिंब सातासमुद्रापार युरोप खंडात जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशांत पोचवले. विषरहित शेतीचे प्रयोग करून येथील शेतकऱ्यांनी विदेशी मार्केट काबीज केले. मात्र, आता या शेतकऱ्याला पुन्हा निसर्गाच्या पुढे हात टेकायची वेळ आली आहे. या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आद्रता राहत आहे. यामुळे डाळिंबाच्या मुळ्या कुजत आहेत. त्याचबरोबर तेल्या रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मूळ कुजल्याने कमजोर झालेले झाड तेल्यामुळे उन्मळून पडत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी डाळिंब बाग काढण्यास सुरुवात केली आहे.
राख आणि परिसरात गेल्या तीन वर्षांत वेळेवर व जास्तीचा पाऊस पडत आहे. हाच पाऊस आमच्या डाळिंब शेतीसाठी घातक ठरतो आहे. दुष्काळात टँकरने पाणी घालून सुद्धा आम्हाला चांगले उत्पन्न मिळाले होते. पण, आता या परिसरातील ९०० एकर क्षेत्रातील डाळिंब काढावे लागले आहे. कीटकनाशक आणि इतर औषधांच्या खर्चाने मेटाकुटीला आला आहे. या औषधांच्या छापील किमती आणि प्रत्यक्ष विक्रीतील किमतीत मोठा फरक आढळून येतो. कंपन्या जास्त किमती छापत आहेत. यामध्ये कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना औषधावर अनाठायी खर्च करावा लागत असल्याचे राख येथील शेतकरी शांताराम पवार यांनी सांगितले.
माझ्याकडे १७ एकर डाळिंब होते. पण मुळकूज आणि तेल्या रोगामुळे संपूर्ण बाग काढून टाकावी लागली आहे. यातील तीन एकर बाग आताच काढून टाकली आहे. ही बाग वाचवण्यासाठी चार लाख खर्च केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजाने ती बाग काढून टाकली. आता आमच्या पुढे बेकारीच मोठं संकट उभ राहिले आहे.
महेंद्र माने, शेतकरी
२५ नीरा
डाळिंबाच्या बागेवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.