पुणे : शहरातील बाईक टॅक्सी विरोधात आरटीओ विभागाने कारवाई करावी, बाईक टॅक्सीचे अॅप बंद करावे या मागणीसाठी रिक्षा चालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये १२ पेक्षा अधिक रिक्षा संघटनांनी सहभागी होत सोमवारी दिवसभर आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले. या रिक्षा बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र मोठे हाल झाल्याचे दिसून आले. रिक्षा चालकांनी पुकारलेल्या बंद मुळे आरटीओ कार्यालयाच्या परिसरात लांबच लांब रिक्षाच्या रांगा लागल्याचे दिसून आले आहे. यावेळी आरटीओ अजित शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सकाळपासून आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. सायंकाळनंतर चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
पुण्यात एका खासगी कंपनीच्या अॅपद्वारे बाईक टॅक्सी सेवा देण्यात येते. या सेवेला कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याने तसेच रिक्षा चालकांचे यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास शहराच्या विविध भागातून हजारो रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर दाखल झाले आहेत. यामुळे आरटीओ कार्यालयापासून जहांगीर रुग्णालयाकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने दुचाकी चालकांसह, चारचाकी चालक आणि रुग्णवाहिकांना मार्ग काढताना त्रास सहन करावा लागला.
या रिक्षा संघटनांचा सहभाग..
महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बघतोय रिक्षावाला फोरम, आम आदमी रिक्षा चालक संघटना, वाहतूक सेवा संघटना, शिवनेरी रिक्षा संघटना, अजिंक्य रिक्षा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, आरपीआय रिक्षा वाहतूक आघाडी, आशिर्वाद रिक्षा संघटना, एआयएमआयएम रिक्षाचालक संघटना, शिवा वाहतूक संघटना, राष्ट्रीय एकता रिक्षा महासंघ यासह अन्य काही रिक्षा संघटनांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे.
रिक्षाची काच फोडली, बाईक टॅक्सी चालकाला मारहाण
या बंद दरम्यान काही रिक्षा संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवला होता, तरी रिक्षा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर जे रिक्षा चालक कोणत्याही संघटनेचे सदस्य नाहीत, त्यांनी देखील रिक्षाने प्रवाशांना सेवा देण्याचे काम सुरू ठेवले होचे. मात्र सिंहगड रोडवर एका रिक्षाची काच फोडण्यात आली तर आरटीओ कार्यालयासमोरून जाणाऱ्या बाईक टॅक्सी चालकाला थांबवून बेदम मारहाण देखील करण्यात आली. यासह डेक्कन बस स्टँडजवळ देखील काही रिक्षा चालक हातात लाकडी दांडा घेऊन उभे असल्याचे दिसून आले.
नागरिकांचे हाल..
बाहेरगावहून आलेल्या नागरिकांसह पुणेकरांचे या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनामुळे हाल झाले. स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) बस स्टँडसह रेल्वे स्टेशनवर सोमवारी रिक्षाच नसल्याने नागरिकांना जास्त पैसे देत टॅक्सीतून प्रवास करावा लागला. पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना १०० जादा बस सोडल्याचे सांगितले.