धनकवडी : शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे एकनाथ शिंदें गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. सेनेत रमेश कोंडे यांच्या कडे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. सोमवारी सकाळी एक हजार कार्यकर्त्यांसह रमेश कोंडे मुंबईला रवाना झाले आहेत. सायंकाळी ते शिंदे यांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत.
राज्यातील सत्तांतर नाट्याचे पडसाद पुणे जिल्ह्यात ही उमटू लागले असून शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. भानगिरे हडपसरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्यामुळे शिंदे गटाला आता पुणे महापालिकेत एक शिलेदार मिळाला आहे. ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर रमेश कोंडे हे जिल्ह्यातील दुसरे शिलेदार असतील.
२०१९ ला रमेश कोंडे यांनी खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून मोठी तयारी केली होती. मात्र, भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला न दिल्याने कोंडे यांच्या पदरी निराशा पडली होती. दरम्यान कोंडे हे १९९५ पासून शिवसेनेत आहेत. खेड शिवापुरचे सरपंच, हवेली तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाप्रमुख अशा पदावर त्यांनी काम केले आहे.
यावेळी लोकमतशी बोलताना कोंडे म्हणाले, मी कोणत्याही पदाधिकाऱ्यांना आग्रह करणार नाही. माझा मित्र परिवार माझ्या सोबत असेल असे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.