लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात कोरोनापश्चात सुधारणा होत असली तरी अजूनही उत्पादन पातळी शंभर टक्क्यांवर पोहोचलेली नाही. सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांनी म्हटले आहे की त्यांची सध्याची उत्पादन पातळी नोव्हेंबरमधल्या ७८ टक्क्यांवरुन डिसेंबर २०२० मध्ये ७९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर (एमसीसीआयआय)ने कोविड काळात केलेल्या नवव्या सर्वेक्षणातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या दीडशेहून अधिक उद्योगांनी या सर्वेक्षणात भाग घेतली.
सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांनी म्हटले आहे की काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या साधारणतः ८२% इतकीच राहिली आहे. सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन पूर्णपणे कोविड पूर्व पातळी (मार्च २०२० पूर्वीची) गाठेल असे कधी अपेक्षित आहे, हा प्रश्नही कंपन्यांना विचारण्यात आला. त्यात २७ टक्के कंपन्यांचे म्हणणे असे आले की या महिन्यात त्यांचे उत्पादन आधीपासूनच कोविडपूर्व पातळीवर आहे. तर २३ टक्के लोकांनी म्हटले की त्यांची उत्पादन पातळी तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कोविडपूर्व पातळीवर जाईल. ३१ टक्के लोकांनी सांगितले की ते ३ ते ६ महिन्यांच्या अवधी लागेल अशी अपेक्षा आहे, १३ टक्के उद्योगांनी असे सांगितले की ६ ते ९ महिने लागतील. सुमारे ४ टक्के उद्योगांच्या मते कोविडपूर्व उत्पादन पातळी गाठण्यासाठी ९ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. एकूण २ टक्के उद्योजकांनी अनिश्चितता व्यक्त केली आहे.
सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात संघटनांकडून सर्वेक्षण केलेल्या संस्थांचे वितरण अनुक्रमे १७%, ३०%, २२% आणि ३१% होते. सर्वेक्षण केलेल्या ६५ % संस्था उत्पादन क्षेत्रातील, १३% सेवा क्षेत्रातील आणि उर्वरित सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रातील आहेत.
‘मराठा चेंबर’चे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, “या महिन्यात सरासरीच्या उत्पादनात केवळ किरकोळ वाढ दिसून येत आहे, परंतु मोठ्या कंपन्या सरासरी ८५ ते ९५ टक्क्यांपर्यंत पुनर्प्राप्ती दाखवत आहेत. विशेषत: गेल्या दोन महिन्यांत लघु, मध्यम उद्योगांच्या पुनर्प्राप्तीचे प्रमाण जोमाने वाढत आहे. एकूणच कंपन्या, गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्याच्या सर्वेक्षण प्रतिसादात परिस्थिती सुधारण्याबाबत अधिक आशावादी आहेत.”
चौकट
स्टील, अँल्युमिनियम,प्लास्टिक महागले
‘मराठा चेंबर’चे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले की, महिना दर महिना प्रगती होत असतानाही असे कळते की लघु, मध्यम उद्योगांना काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अलिकडच्या काळात कच्च्या मालाच्या म्हणजे विशेषत: स्टील, अॅल्युमिनियम आणि प्लास्टिकच्या किमती वाढल्याचे मोठे आव्हान आहे. यामुळे बऱ्याच लघु मध्यम उद्योगांना खीळ बसत आहे. सरकारने याची नोंद घ्यावी व योग्य तो हस्तक्षेप करावा असे आम्ही आवाहन करतो.