आज सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर नागरिक लसीची प्रतीक्षा करत उभे आहेत. राज्यात लसींचा तुटवडा भासू लागल्याने नागरिकांना लस न घेता घरी परतावे लागले आहे. त्यामुळे शहरातील विविध केंद्रांवर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले आहे.
नागरिकांनी लसीबाबत केंद्र चालकाला विचारले असता, त्यांच्याकडून "लस संपल्या आहेत. तुम्ही उद्या या ", आम्ही आता काहींच करू शकत नाही. अशी उत्तरे देण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रावर लसीकरणाच्या प्रतीक्षेत उपस्थित नागरिकांशी लोकमतने संवाद साधला.
आम्ही खूप लांबून आलो आहोत. आता काय करणार परत जावे लागणार आहे. इथे आम्ही सकाळपासून थांबलो आहोत. लस उपलब्ध नाहीहे सांगायलाही केंद्राबाहेर कोणीही उभे नाही. नाइलाजास्तव परत जावे लागत आहे. असे ज्येष्ठ नागरिकाला पुन्हा पुन्हा येणे अतिशय धोकादायक आहे हे सरकारने जाणून घ्यावे. असे नागरिकांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक पाहता केंद्राकडून सर्वाधिक लसींचा पुरवठा राज्याला होणे गरजेचे होते. अशी राज्य सरकारकडून मागणी केली जात आहे. लशीच्या तुटवड्यावरून केंद्र-राज्य सरकारमधील संघर्षाचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. त्यामुळे पुणे शहरात लसीकरण केंद्र बंद होण्यास सुरुवात झाले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. लसीकरणासाठी गेलेल्या अनेक नागरिकांना माघारी फिरावे लागले.
पुणे शहरासह जिल्ह्यात सध्या पाचशेहून अधिक केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. गुरुवारी त्यापैकी ४१० केंद्रावर लसीकरण झाले. शहरातील काही लसीकरण केंद्रावर अवघ्या ५० ते दीडशे लाभार्थ्यांना लस देणे शक्य झाले. त्यानंतर लशींचा साठा संपल्याने लसीकरण बंद केल्याचे जाहीर करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातही लसींचा साथ उपलब्ध नसल्याने आज सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या ५९ लसीकरण केंद्रामार्फत सुमारे १ लाख ८० हजार ९२ व्यक्तींना लस देण्यात आले आहे. तर खाजगी २८ लसीकरण केंद्रामार्फत ५० हजार ७७७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे, शहरातील एकुण २ लाख ३० हजार ८६९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीअभावी बंद झालेली केंद्रेगॅलेक्सी केअर-कर्वेरोड, पवार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल-धनकवडी, कृष्णा हॉस्पिटल-कोथरूड, कोटबागी हॉस्पिटल-औंध, अण्णासाहेब मगर हॉस्पिटल आणि साने गुरुजी रुग्णालय-हडपसर, संजीवनी हॉस्पिटल व लोकमान्य हॉस्पिटल-सेनापती बापट रोड, सह्याद्री हॉस्पिटल- बिबवेवाडी, नोबेल हॉस्पिटल-हडपसर, सिटी केअर हॉस्पिटल, इनामदार हॉस्पिटल-वानवडी, विलू पूनावाला हॉस्पिटल-हडपसर, कोहोकडे हॉस्पिटल, एमजेएम हॉस्पिटल-घोले रोड, जगताप हॉस्पिटल-सिंहगड रोड, पुणे अडव्हेन्टिस हॉस्पिटल, बाबूराव शेवाळे हॉस्पिटल, सहदेव निम्हण हॉस्पिटल, बिंदू माधव ठाकरे हॉस्पिटल, कोथरुड.