आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत लैंगिक छळाच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा एका महाराजाकडून अल्पवयीन तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. अशा वाढत्या प्रकारांमुळे आळंदी ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सदरची घटना १५ सप्टेंबर २०२४ ते २३जानेवारी दरम्यान आळंदीतील धन्य इंद्रायणी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत घडली. किरण महाराज ठोसर (वय ३३ रा. आळंदी - देवाची, ता. खेड जि. पुणे) असे लैंगिक शोषण तसेच विनयभंग केलेल्या महाराजाचे नाव असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मागील चार महिन्यांपासून पीडित अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या कारणावरून वेळोवेळी मारहाण करून तिच्या अंगावर, पाठीवर तसेच अन्य ठिकाणी नकोसा स्पर्श करून विनयभंग करत होता. त्यानुसार संबंधित महाराजावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान महिला व बालविकास विभागाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडूनकेली जात आहे.