पिंपरी : महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) आता पालिका हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. महापालिकेचे मोरवाडी वकासारवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत. मोरवाडी आयटीआयमध्ये १४ ट्रेड असून, ३६ तुकड्या आहेत. कासारवाडीत मुलींसाठी असलेल्या आयटीआयमध्ये ६ ट्रेड असून ६ तुकड्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे असल्याने नोकरीच्या संधीही उपलब्ध होतात. त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. यामध्ये शहरासह शहराबाहेरील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मात्र, याअगोदर महापालिकेच्या आयटीआयमध्ये केवळ महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जायचा. जागा शिल्लक राहिल्यास हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांचा विचार केला जायचा. यामुळे हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांची धावपळ व्हायची. मात्र, आता हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांसाठी तीस टक्के कोटा ठेवण्यात येणार आहे. २०१६ च्या प्रवेश सत्रापासून केंद्रीय आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविताना महापालिका हद्दीत वास्तव्यास असलेल्या प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना ७० टक्के कोट्यातून प्रवेश देण्यात यावा आणि महापालिका हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांना ३० टक्के कोट्यातून प्रवेश देण्याच्या उपसूचनेस सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)
हद्दीबाहेरील विद्यार्थी आयटीआयसाठी पात्र
By admin | Published: April 25, 2016 1:22 AM