Shivaji Nagar Vidhan Sabha: 'बाहेरचा उमेदवार सहन केला जाणार नाही', निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे अंतर्गत तुंबळ युद्ध
By राजू इनामदार | Published: October 7, 2024 05:43 PM2024-10-07T17:43:16+5:302024-10-07T17:43:37+5:30
बाहेरचा उमेदवार लादला जाईल या शक्यतेने शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व इच्छुक एकत्र आले
पुणे: विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली असल्यामुळे सर्वच मतदारसंघांमधील इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. तिकडे कोथरूड विधानसभा मतदान संघात भाजपच्या इच्छुकांचा धुमाकूळ सुरू असताना इकडे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्येही तुंबळ युद्ध सुरू झाले आहे. बाहेरचा उमेदवार लादला जाईल या शक्यतेने या मतदारसंघातील सर्व इच्छुक एकत्र आले असून त्यांनी कोणत्याही स्थितीत बाहेरचा उमेदवार सहन केला जाणार नाही असा निर्धार जाहीरपणेच नाही तर लेखी व्यक्त केला आहे.
त्यासाठी त्यांनी अधिकृत बैठक घेतली. त्यामध्ये अधिकृत ठराव केला. त्यावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या व हा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पाठवलाही. त्यात त्यांनी स्पष्टपणे, ‘बाहेरचा उमेदवार स्विकारला जाणार नाही, त्याचे काम करण्यात येणार नाही’ असा इशाराच दिला आहे.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा अल्प मतांनी पराभव झाला. आता ५ वर्षांनंतर काँग्रेसचे वारे आहे. लोकसभेला मतदारांनी राज्यात काँग्रेसला चांगली साथ दिली. एकही खासदार नसताना तब्बल ११ खासदार निवडून आले. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात पराभव झाला असला तरी मताधिक्य तब्बल दीड लाख मतांनी कमी झाले आहे. त्यामुळे या जागेवरून पक्षाला विजय मिळण्याची शक्यता वाढली आहे. ती लक्षात घेऊन तसेच काँग्रेसच्या बाजूने तयार होणार वातावरण पाहून आता इथून लढण्यासाठी अन्य पक्षातील काही प्रबळ इच्छुक तयार झाले आहेत. पूर्वीचा इतिहास, आर्थिक तसेच सामाजिक क्षमता दाखवून ते काँग्रेसने उमेदवारी दिली तर जिंकून येण्याच्या गोष्टी करत आहेत.
पक्षामध्येही वरिष्ठ स्तरावर त्यांच्यातील एका उमेदवाराला पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. त्यालाच निष्ठावंत इच्छुकांचा विरोध आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाचे शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव यांच्या उपस्थितीत या मतदारसंघातील पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांची बैठक घेतली. रविवारी सायंकाळी उशिरा हा बैठक झाली. त्यात उमेदवार आयात करण्यावर चर्चा झाली. अड़चणीच्या काळात जे बाहेर संधी असूनही पक्षाबरोबर राहिले, पक्षनिष्ठेने काम करत राहिले, त्यांना डावलून बाहेरच्या प्रवेश कशासाठी द्यायचा? त्यांना उमेदवारीही कशासाठी द्यायची. त्यामुळे असा बाहेरचा उमेदवार लादू नये, त्याऐवजी पक्षनिष्ठा दाखवणाऱ्या इच्छुकांपैकी कोणाही एकाला उमेदवारी द्यावी असा ठरावच बैठकीत मंजूर करून घेण्यात आला व त्याच्या प्रती पक्षनेतृत्वाला पाठवण्यात आल्या.
पक्षातीलच काही वरिष्ठ नेते त्यांच्या वैयक्तीक स्वार्थासाठी बाहेरच्या एका उमेदवाराला पक्षात प्रवेश देऊन त्यांना या मतदारसंघातून लढवण्याचा विचार करत आहेत, असे या बैठकीला उपस्थित काहीजणांनी सांगितले. त्यांच्या याच पद्धतीने पुण्यातून पक्ष नामशेष होऊ लागला तरीही त्यांना शहाणपण यायला तयार नाही अशी टीका त्यांनी केली.