पुणे - कोरेगाव-भीमामध्ये माता, भगिनींवर अत्याचार झाले. गावाबाहेरच्या कार्यकर्त्यांनी, संघटनांनी कोरेगाव-भीमामध्ये येऊन हिंसाचार केला त्याचा स्थानिका गावक-यांशी काहीही संबंध नाही असा दावा कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी केला आहे. कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली.
आम्ही अनेकवर्षांपासून एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहोत. आमच्यात आपसात कुठलाही वाद नाही. बाहेरच्यांनी इथे येऊन हिंसाचार केला. उलट कोरेगाव-भीमावर अन्याय होतोय. मागच्या तीन दिवसांपासून लाईट-पाणी नाही अशी इथे अवस्था आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. कोरेगाव-भीमामध्ये मोठया प्रमाणावर तोडफोड, जाळपोळ झाली. लवकरात लवकर शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरवर्षी इथे लाखोंच्या संख्येने लोक येतात. शासनाने आवश्यक बंदोबस्त न ठेवल्याने हिंसाचार घडला असे गावक-यांनी सांगितले.
1 जानेवारीला माता, महिलांवर अत्याचार झाले. थरकाप उडवणा-या गोष्टी आमच्याडोळयासमोर घडल्या असे मराठा समाजातील एका महिला प्रतिनिधीने सांगितले. या हिंसाचारात मराठा समाजातील मुलगा राहुल फटांगडेचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची मदत द्यावी अशी मागणी मराठा समाजातील महिला प्रतिनिधीने केली.
1 जानेवारीला कोरेगाव-भीमामध्ये दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जाळपोळ, वाहनांची तोडफोड, रास्ता रोको, रेल रोको, मार्चे, आंदोलने झाली. त्यामुळे दोन समाजांमधील तेढ अधिक वाढून राज्यातील वातावरण गढूळ झाले.
त्या पार्श्वभूमीवर आता कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांनी सामंज्यसाची भूमिका घेत वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. गावक-यांनी परस्पराविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरेगाव-भीमामध्ये नेमक काय घडलं ? कशामुळे इतका हिंसाचार उफाळून आला? त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह अन्य माहिती घेत आहेत. बंदच्या दरम्यान हिंसाचार करणा-यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थ सुद्धा अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे गावक-यांनी आता सामंज्यसाची भूमिका घेतली आहे.