प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळातील आऊटसोर्सिंगचा थेट फटका अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणाऱ्या भावी कर्मचाऱ्यांना बसत आहे. जवळपास पाचशे कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी एसटीत नोकरीसाठी अर्ज केला. यातील ५० टक्क्यांहून अधिकांचे शिक्षण कमी असल्याने सुरक्षा रक्षक, स्वच्छक व सफाई कामगार ही पोस्ट हवी आहे. मात्र, त्याचे आऊटसोर्सिंग झाल्याने भावी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. काही जण दोन वर्षांपासून, तर काही जण १२ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य परिवहन महामंडळात जवळपास ५०० जागा अनुकंपा तत्त्वावर भरण्यात येणार आहे. यातील ३०० जागांसाठी विविध कारणामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी अर्ज केला, तर २०० जागेवर कोरोनाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना घेतले जाणार आहे. मात्र, यासाठी किमान सहा महिने, तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बॉक्स १
दहावीपर्यंत शिक्षण असल्याने :
अनुकंपा तत्त्वावर नोकरी समाविष्ट होऊ पाहणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील तरुणांची संख्या अधिक आहे. त्यांचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांनी सुरक्षा रक्षक, शिपाई, स्वच्छक, सफाई कामगार आदी जागेसाठी अर्ज केला आहे. मात्र, या जागा बाह्य कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याने एसटी महामंडळ भावी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा यादीत समाविष्ट करून त्यांना प्रतीक्षा करण्यास भाग पाडत आहे. त्यात त्या ईच्छुकाचे वयही निघून जाते. आर्थिक नुकसान होत आहे.
बॉक्स २
पदवीधर झाले वाहक, चालक :
अनुकंपा तत्त्वावर भरती होताना काही कर्मचारी हे पदवीधर आहे. त्यांच्यासाठी लिपिक हे पद आहे. मात्र, लिपिकाची जागा नसल्याने त्यांना वर्षोनुवर्षे थांबविण्यात आले. त्यानंतर त्यांच्यापुढे चालक किंवा वाहकचा पर्याय ठेवून ती नोकरी करण्यास भाग पाडले जाते. चालक किंवा वाहक पदासाठी दहावी पास असणे व आरटीओतून बॅच (बिल्ला) काढणे गरजेचे असते. सध्या एसटीत जवळपास ६०० लिपिकांची आवश्यकता आहे. मात्र, ती उपलब्ध नसल्याने असे अनेक पदवीधर वाहक व चालक म्हणून काम करीत आहे.
कोट १ : मी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर २००९ साली एसटीत नोकरीसाठी अर्ज केला. माझे शिक्षण १२ वी झाले आहे. माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार वाहतूक नियंत्रक या जागेसाठी मी अर्ज केला. मात्र, माझी उंची अधिक असल्याचे कारण सांगत मला त्या जागेवर काम करता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर सहायक तांत्रिक पदासाठी देखील अर्ज केला तो पण अर्ज नामंजूर करण्यात आला. आता एसटी प्रशासन शिपाई पदासाठी अर्ज करा, असे सांगत आहे. १२ वर्षे झाले मी नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे.
- अजय पवार, अर्जदार, यवतमाळ .
कोट : २
अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नऊ वर्षे प्रतीक्षा यादीवर प्रलंबित ठेवणे हे अन्यायकारक व दुर्दैवी असून या सर्व प्रकरणांमध्ये पूर्वीची परिपत्रके व त्यातील नियम, अटी तसेच प्रसंगी शैक्षणिक पात्रता बदलून तत्काळ एक वेळचा पर्याय म्हणून नोकऱ्या दिल्या पाहिजेत.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस,महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस