पुणे : कोरोनाच्या संसर्गाने सर्वांच्याच मनात प्रचंड भीती निर्माण केली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रतिकारशक्ती वाढवण्याचे सर्व पर्याय आजमावले जात आहेत. मल्टिव्हिटॅमिन, सी व्हिटॅमिनच्या गोळ्या तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्यांचे सेवन शरीराला अपायकारक ठरत आहे. इम्युनिटी बुस्टर औषधांमुळे शरीरातील उष्णता वाढणे, हाता-पायावर सूज येणे, चेहऱ्यावर पुरळ, पित्त अशा तक्रारी वाढल्या आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास कोणत्याही आजाराचा संसर्ग लवकर होतो, असे वैद्यकशास्त्र सांगते. कोरोना साथीच्या काळात तर इम्युनिटीचे महत्व वारंवार अधोरेखित होत आहे. संसर्गापासून बचाव म्हणून विविध उपाय नागरिकांकडून अवलंबले जात आहेत. सोशल मीडियावर औषधांची नावे, उपयुक्तता यांचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. टीव्हीवरील जाहिरातींमधूनही काही औषधे आपल्याला कोरोनापासून दूर ठेवू शकत असल्याचा दावा केला जातो. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांचे सेवन करताना दिसत आहेत. औषधांचे प्रमाण, त्यातील घटक, पॉवर याबाबत कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता आणि पुरेशी माहिती न घेता दररोज औषधे घेतली जात आहेत. प्रमाण चुकल्याने, अतिसेवनाने इतर शारीरिक तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागला आहे.
फॅमिली डॉक्टरांना विचारल्याशिवाय, त्यांच्याकडून तपासणी झाल्याशिवाय कोणतेही औषध थेट मेडिकल स्टोअरमधून घेऊन येणे म्हणजे आपणहून इतर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. इम्युनिटी बुस्टर गोळ्याप्रमाणे अँटीबायोटिक गोळ्याही स्वतःच्या मनाने घेतल्यास यकृतावर, मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतात. अँलोपॅथीप्रमाणेच होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधेही केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवायची म्हणून न घेता आपल्या शरीराला योग्य ठरतील का, हे पडताळून पाहण्याची गरज असते, असे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-------प्रत्येकाच्या शरीराची ठेवण, वजन, उंची, वैद्यकीय पार्श्वभूमी वेगवेगळी असते. त्यामुळे एकाच प्रकारचे औषध सर्वाना उपयुक्त ठरू शकत नाही. इतर आजारांची तीव्रता, त्यासाठी सुरू असलेले औषधोपचार, अशा विविध बाबींचा अभ्यास करून कोणते औषध घेतले हे ठरवले जाऊ शकते. सध्या तरी कोणत्याही विशिष्ट औषधाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते, असे कोणतेही संशोधन झालेले नाही. त्यामुळे स्वतःच स्वतःचे डॉक्टर होऊन इतर व्याधींना आमंत्रण देऊ नये, असे सांगावेसे वाटते.
- डॉ. जगदीश देशपांडे, जनरल फिजिशियन
--------काही औषधे घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकली असती तर कोरोना केव्हाच नियंत्रणात आला असता, याचा विचार करायला हवा. पौष्टिक आहार, दररोज किमान एक तास व्यायाम, सकारात्मकतेसाठी ध्यानधारणा, तणावमुक्त जीवनशैली या माध्यमातून शरीर निरोगी ठेवले जाऊ शकते. पोषकतत्त्वे, जीवनसत्वे औषधांमधून मिळवण्यापेक्षा दररोजच्या आहारातून, नैसर्गिक गोष्टींमधून मिळवता येऊ शकतात.
- डॉ. संजीवनी बेहरे, फिटनेस एक्स्पर्ट