पुणे : राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी तो जास्तच झाल्यामुळे तेथील पिकांची हानी झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एकूण एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला.
राज्याच्या १४ जिल्ह्यांत ५१ तालुक्यांमधील काही क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. यात धुळे, जळगाव, लातूर, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. येथील सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांना अतिवृृष्टीचा माेठा फटका बसला आहे.
मका, उडीद, तूर, काही ठिकाणी हळदी पिकाचेही नुकसान झाले. नागपूरमधील संत्र्यांच्या बागा, अन्य काही तालुक्यांमधील फळबागाही जास्तीच्या पावसाने बाधित झाल्या आहेत. महसूल विभागाच्या साह्याने पंचनामे करण्यात येत आहेत.