पुणे : आधुनिक युगात मुलांच्या हातात टॅब दिले जात आहेत. मोबाईल कसा वापरावा हे शिकवले जात आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती शोधण्यासाठी मुले गुगलचा वापर करतात. गुगलवरील माहितीची सत्यता पडताळली जात नाही. यामुळे मुलांच्या बुद्धीचा विकास होण्याऐवजी ती खुंटते आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ झाला. सुळे यांच्या हस्ते ज्यूरी पुरस्कार जिल्हा परिषद शाळा बुरुंगले वस्ती, बारामती, गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार महादेव बाजारे (जांबुत, शिरूर), जयश्री झाडबुके (डोरलेवाडी, बारामती), कृष्णा भांगरे (भोयरे, मावळ) दिव्यांग शिक्षक पुरस्कार नारायण बोरकर (शिंदे, खेड), मृणाल मारणे (बावधान क्र. ३, मुळशी) यांच्यासहित जिल्ह्यातील ७३ शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील सुनील कुऱ्हाडे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी शेळके आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाचा काही उपयोग नाही. लहान मुलांना टॅब दिल्याने त्यांचा अभ्यास सुधारतो का, याचा आपण विचार करायला हवा. शिक्षक चांगला असेल तर मुलांना टॅबची गरज नाही. देशात महाराष्ट्र शिक्षणात अग्रेसर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळाप्रमाणे आपले निर्णय बदलू नये. मुंबईच्या शाळांमध्ये टॅब वापरले जात नाहीत. शाळेचा केंद्रबिंदू तंत्रज्ञान नसून शिक्षक आहे. लहानपणापासून मुलांना योगाचे क्लास लावले जातात. त्यांचे मातीत खेळण्याचे वय आहे. अशा गोष्टींमध्ये पालकांनी मुलांना अडकवू नये. शाळेतूनही पर्यावरणविषयी जनजागृती करावी. वृक्षारोपण, स्वच्छतेविषयी मार्गदर्शन, अशा मोहीम राबवणे गरजेचे आहे.........शिक्षकाने हेल्थ कार्ड काढायला हवेप्रत्येक शिक्षकाने हेल्थ कार्ड काढायला पाहिजे. शिक्षकांचे आरोग्य उत्तम असेल तर ते मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देतील. मुलांचीही आरोग्यसंदर्भात काळजी घेतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातील भिडे वाड्यातून शिक्षणाची सुरुवात केली. त्याचेच परिणाम पुणे जिल्ह्यात दिसत आहेत. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. शिक्षकांचा सत्कार होणे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे
तंत्रज्ञानाच्या अतिवापराने मुलांची बुद्धी खुंटते : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 11:24 AM
शिक्षक चांगला असेल तर मुलांना टॅबची गरज नाही..
ठळक मुद्देपुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरणशिक्षकाने हेल्थ कार्ड काढायला हवे