पुणे : कोणताही स्टार्टअप सुरू करताना केवळ नवसंकल्पना महत्त्वाची नाही तर त्याबरोबरच त्यामध्ये होणारी गुंतवणूक, गुंतवणूकदार, बाजारस्थिती, टीम वर्क तसेच त्यासाठीची लागणारी कायदेशीर माहिती या सर्व बाबींची माहीत असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सँनफ्रान्सिस्को येथील ‘सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप अॅडवायझर अँड इन्व्हेस्टर’ कदम यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागातर्फे ‘इनोफेस्ट २०२१’ मधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्टार्टअप सुरू होण्यापूर्वी विस्तृत मार्गदर्शन मिळावे यासाठी आयोजित ‘मेंटॉरशिप प्रोग्राम’ या ऑनलाइन कार्यक्रमात ‘अर्ली स्टेज इन्व्हेस्टमेंट’ या विषयावर कदम बोलत होते. यावेळी ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट’ या विषयावर ‘व्हाइट कॉलर लीगल’चे संचालक कुणाल सरपाल यांनीही मार्गदर्शन केले. या ऑनलाइन कार्यक्रमात अनेक विद्यार्थी व नवउद्योजकांनी सहभाग घेतला होता.
कदम यांनी गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून स्टार्टअपकडे कसे पाहावे याबाबत सांगितले. नवउद्योजकांसाठी गुंतवणूकदार हा महत्त्वाचा घटक असून त्यांच्यातील संबंध असावेत याबाबत माहिती दिली. तसेच स्टार्टअपमध्ये प्रत्येक टप्प्यावरील गुंतवणूक, उत्पन्न, मार्केटिंग आणि ब्रँडिंग याबाबतही कदम यांनी सविस्तर सांगितले. परमार यांनी भारत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीच्या कायद्याविषयी माहिती दिली. आपले पेटंट कसे नोंदवावे, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे. आदीबाबत त्यांनी माहिती दिली.
---------