पुणे : भारतीय संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण याचप्रमाणे समाज ऋणाचीही संकल्पना आहे. समाज ऋण फेडण्यासाठी या कठीण काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे सामाजिक भान जागृत ठेवून केलेल्या कार्याला तोड नाही. या कठीण काळात अनेक ज्ञात-अज्ञात हात पुढे आले आणि त्यांनी समाजातील संकटग्रस्तांना मदतीचा हात दिला. ‘तू फक्त लढ’ असा विश्वास देणाऱ्या संस्था आणि व्यक्ती आजूबाजूस असल्याने कितीही मोठ्या संकटाचा आपण धीरोदात्तपणे सामना करू शकतो, असे नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांनी सांगितले.
आम्ही एकपात्री महाराष्ट्र संस्थेतर्फे ‘जनजागर’ या उपक्रमाअंतर्गत ज्यांच्या घरातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले, अशा व्यक्तींच्या घरच्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी जमेनिस बोलत होत्या. कै. सीताबाई मारुती पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र गजानन पवार आणि पत्नी गायत्री पवार यांनी दिलेल्या देणगीतून ही मदत करण्यात आली. मुख्य संयोजक एकपात्री कलाकार वंदन राम नगरकर उपस्थित होते.
या वेळी नाझ इनामदार, दीपाली जाधव, रोहिणी कांबळे, शिला राम कटारे, वंदना साळुंखे, सचिन बिबवे, जयवंत पंडित, प्रज्वल पानकर, अथर्व निवृत्ती पांढरे आणि राजश्री, दांडेकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मदतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट स्वीकारले.